औरंगाबाद – सहारा समुहाने सहारा सिटी हा प्रकल्प औरंगाबादेत सुरू केला होता. हा प्रकल्प रखडल्याने सुब्रतो रॉय यांच्यासह ६ संचालक मंडळांविरोधात ग्राहक मंचाने अटक वॉरंट जारी केले आहे. सहारा समुहाकडून शहरातील सातारा परिसरात ८२ एकर जागेवर सहारा सिटी हा प्रकल्प उभारण्यात येणार होता. मात्र, सहारा समुहाने ग्राहकांची फसवणूक केल्याने समुहाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती.
सहारा समुहाकडून करण्यात आलेल्या सहारा सिटीच्या जाहिरातीमध्ये पहिल्या टप्प्यात ५ हजार घरांची घोषणा केली होती. त्यावेळी औरंगाबादच्या अनेक नागरिकांनी घर खरेदीसाठी नोंदणी केली आणि सहारा समुहाकडे खरेदीच्या मुळ रकमेच्या १० टक्के रक्कम भरली. त्यानंतर ३ वर्षात ‘सहारा सिटी’मध्ये घर देण्याचे आश्वासन समूहाने दिले होते. मात्र, ३ वर्षात घराचा पायादेखील खोदण्यात न आल्याने ग्राहकांनी आपले पैसे परत मिळावे यासाठी अर्ज केले. मात्र, घर देखील नाही आणि रक्कम परत मिळत नसल्याने अखेर अनेकांनी ग्राहक मंचात धाव घेतली.
ग्राहक मंचाने सहारा समुहाविरोधात तक्रार दाखल करत समुहास तक्रारदारांना १२ टक्के दराने मुळ रक्कम ३० दिवसात परत करण्याचे आदेश दिले होते. मात्र, रक्कम परत केली नाही. त्यानंतर ग्राहक मंचाने सहारा समुहास समंस बजावत आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले. मात्र, सहाराने कोणत्याच हालचाली न केल्याने ग्राहक मंचाने सुब्रोतो रॉय यांच्यासह ६ संचालक मंडळांविरोधात जामीनपात्र अटक वारंट जारी केले आहे.
सहारा समुहाने ज्या जागेवर हा प्रकल्प उभारणीसाठी जाहिरात दिली त्या जागेवर गेल्या आठ वर्षात कुठलेही काम सुरू झालेले नाही. इतकेच नाही तर त्या जागेची निलामी देखील झाली असून एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाने ती सर्व जागा विकत घेतली असल्याने संपूर्ण प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.