skip to content
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रउर्वरित महाराष्ट्रातील शासकीय जमिनींवरील भाडेपट्ट्याच्या नूतनीकरण धोरणास मान्यता

उर्वरित महाराष्ट्रातील शासकीय जमिनींवरील भाडेपट्ट्याच्या नूतनीकरण धोरणास मान्यता

राज्य शासनाने यापूर्वी निश्चित केलेल्या घटकांव्यतिरिक्त उर्वरित महाराष्ट्रामधील शासकीय जमिनींवरील संपुष्टात आलेल्या तसेच यापुढे संपणाऱ्या भाडेपट्ट्याचे नूतनीकरण करण्यासंबंधीचे धोरण निश्चित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

यापूर्वी बृहन्मुंबई, माथेरान, महाबळेश्वर, रायगड जिल्ह्यातील ड सत्ता प्रकाराचे भाडेपट्टे, भाडेपट्ट्याने दिलेल्या शेतजमिनी व औद्योगिक वसाहतीसाठी दिलेले भाडेपट्टे आणि विदर्भातील नझूल जमिनी यांसंदर्भात भाडेपट्टा नूतनीकरणाचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे या घटकांना वगळून उर्वरित महाराष्ट्रातील शासकीय जमिनींवरील संपुष्टात आलेल्या तसेच यापुढे संपणाऱ्या भाडेपट्ट्याचे नूतनीकरण करण्यासंबंधीचे धोरण आज निश्चित करण्यात आले.

उर्वरित महाराष्ट्रात शासकीय जमिनी भाडेपट्ट्याने देण्यात आलेल्या असल्या तरी त्यामधील अटी व शर्ती एकसारख्या नाहीत. काही प्रकणांत मंजुरी आदेशात नमूद अटी व शर्तींवर भाडेपट्ट्याचे नूतनीकरण करण्याची तरतूद आहे. तर काही प्रकरणात सुधारित भुईभाडे आकारण्याच्या अटी व शर्तींवर नूतनीकरण करण्याची तरतूद आहे. प्रत्येक भाडेपट्ट्यांच्या मिळकतीचे वेगवेगळे धोरण असून भाडेपट्ट्याची मुदत एकाच वेळी संपुष्टात येत नाही. भाडेपट्ट्याखालील जमिनीच्या किंमती वाढल्या तरी शासकीय जमिनीच्या भुईभाड्याचे दर भाडेपट्ट्याच्या संपूर्ण कालावधीपर्यंत स्थिर राहतात. या पार्श्वभूमीवर उर्वरित महाराष्ट्रातील शासकीय जमिनीवरील संपुष्टात आलेल्या भाडेपट्ट्यांचे नूतनीकरण न झाल्यामुळे महसुलाची हानी होते. त्यामुळे उर्वरित महाराष्ट्रासाठी भाडेपट्टा नूतनीकरणाचे धोरण निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आजच्या धोरणाप्रमाणे आदेश निर्गमित होण्यापूर्वी संपुष्टात आलेल्या भाडेपट्ट्यांच्या बाबतीत आदेशाच्या तारखेपर्यंत जुन्या दराने भुईभाडे आकारून त्याची वसूली करून मानीव नूतनीकरण करण्यात येईल. तसेच त्यापुढील कालावधीसाठी या नवीन धोरणातील पद्धतीनुसार संबंधित जमिनीच्या नूतनीकरणाच्या आदेशाच्या दिनांकापासून 30 वर्षाच्या कालावधीसाठी भाडेपट्ट्यांचे नूतनीकरण करण्यात येईल. नूतनीकरण करताना वार्षिक दर विवरणपत्रातील दरांनुसार येणारे मुल्यांकन विचारात घेऊन निश्चित करण्यात आलेल्या सुत्रानुसार भुईभाड्याचा दर आकारण्यात येईल. तसेच भाडेपट्टयाच्या 30 वर्षांच्या कालावधीत दर 5 वर्षांनी वार्षिक दर विवरणपत्रातील दरांनुसार त्या त्या वेळी येणाऱ्या मुल्यांकनावर भाडेपट्ट्याच्या दरात सुधारणा करण्यात येईल.

यासाठी भाडेपट्ट्याच्या नूतनीकरणासाठी भुईभाड्याची रक्कम निश्चित करण्याचे सूत्र ठरविण्यात आले आहे. त्यानुसार भाडेपट्ट्याने धारण केलेल्या शासकीय जमिनीचे मुल्य आकारताना मुद्रांक शुल्क विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या वार्षिक दर विवरणपत्राचा वापर करण्यात येईल. प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील दरानुसार संबंधित मिळकतीचे खुल्या जमिनीच्या दराने संबंधित जमिनीचे एकूण मुल्य आकारले जाईल. अशाप्रकारे जमिनीचे एकूण मूल्य निश्चित केल्यानंतर अशा मूल्याच्या 25 % रकमेवर निवासी, औद्योगिक, वाणिज्यिक तसेच निवासी आणि वाणिज्यिक या मिश्र प्रयोजनासाठी सर्वसाधारणपणे अनुक्रमे २%, 4%, 5% व 5% याप्रमाणे वार्षिक भुईभाडे आकारण्यात येईल.

व्यक्तिगत निवासी वापरासाठी भाडेपट्ट्याने दिलेल्या 500 चौरस मीटर किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्रफळाच्या शासकीय भूखंडाच्या भाडेपट्ट्याचे नूतनीकरण करताना रेडी रेकनरप्रमाणे जमिनीच्या किंमतीच्या 25 टक्के रकमेवर 1 टक्के इतके वार्षिक भूईभाडे आकारणी करण्यात येईल. सहकारी गृहनिर्माण संस्थांना निवासी वापरासाठी दिलेल्या शासकीय भूखंडांच्या भाडेपट्ट्याचे नूतनीकरण करताना 1 टक्के इतके वार्षिक भूईभाडे आकारणी करण्यात येईल. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, अनाथालये, धर्मशाळा या कारणांसाठी भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनींसाठी 0.5 टक्के इतके वार्षिक भूईभाडे आकारण्यात येईल. याव्यतिरिक्त इतर बाबींसाठीही भाडेपट्ट्याच्या नूतनीकरणाचे सविस्तर सूत्र निश्चित करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments