महत्वाचे…
१. आ. प्रकाश सुर्वे व त्यांच्या साथीदारांना तातडीने अटक करण्याची मागणी २. राज्यकर्त्यांकडून गुन्हेगारांना उघड राजाश्रय मिळत असल्याने गुन्हेगार बेलगाम झाले ३. पोलीस स्वतःच ‘सुपारी किलिंग’करू लागल्याचा आरोप
मुंबई: सांगलीतील अनिकेत कोथळेच्या कोठडीतील हत्या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून दोषींना फासावर चढविण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
विखे पाटील यांनी आज सांगली येथे कोथळे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, केवळ संशयाच्या आधारे सर्वसाधारण कुटुंबातील युवक असलेल्या अनिकेत कोथळेला तातडीने अटक करून मरेपर्यंत मारहाण करण्यात आली. तर दुसरीकडे मुंबईत शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्याविरूद्ध मागील महिनाभरापासून अपहरणाची लेखी तक्रार असताना या प्रकरणात अद्याप साधा गुन्हा दाखल करण्याची तसदी देखील पोलिसांनी घेतलेली नाही.
अलिकडच्या काळात पोलीस खात्याची अधोगती झाली आहे. राज्यकर्त्यांकडून गुन्हेगारांना उघड राजाश्रय मिळत असल्याने गुन्हेगार बेलगाम झाले असून, परिणामतः गुन्हेगारी वाढली आहे. गुन्हेगारीकडे डोळेझाक करता-करता आता पोलीस स्वतःच ‘सुपारी किलिंग’करू लागल्याचा आरोप त्यांनी अनिकेत कोथळेच्या मृत्युचा संदर्भ देताना केला. बेकायदेशीर व्यवसाय दडपण्यासाठी पोलिसांनी अनिकेतला खोट्या गुन्ह्यात अडकवून ताब्यात घेतल्याचा कोथळे कुटुंबियांचा आरोप अत्यंत गंभीर आहे. अनिकेत कोथळेला न्याय द्यायचा असेल तर आरोपींना शिक्षा होण्यासोबतच त्याच्या उद्धवस्त झालेल्या कुटुंबाला आधार देण्याची मागणीही त्यांनी केली.
मुंबईतील शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्यावरील आरोपाबाबत बोलताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, राज कोरडे नामक तरूणाच्या अपहरणाची अत्यंत गंभीर लेखी तक्रार महिनाभरापासून पोलिसांकडे आलेली आहे. आमदार सुर्वे, त्यांचे व्यावसायिक भागीदार गणेश नायडू व इतरांनी या युवकाचे अपहरण करून त्याला सुरतला डांबून ठेवल्याचा स्पष्ट उल्लेख या तक्रारीत आहे. पीडित युवक व त्याच्या आईचे लेखी बयाण देखील घेण्यात आले आहे. तरीही या प्रकरणात अजून गुन्हा का दाखल झालेला नाही? यातील संशयीत आरोपी शिवसेनेचे आमदार असल्याने त्यांना पोलिसांनी संरक्षण प्रदान केले आहे का? असे प्रश्न उपस्थित करून आ. प्रकाश सुर्वे व त्यांच्या साथीदारांना तातडीने अटक करण्याची मागणी त्यांनी केली. शिवसेना सतत नैतिकतेच्या गप्पा करते. पण आता त्यांच्याच एका आमदारावर गंभीर आरोप असताना शिवसेना मौन धरून बसली आहे. त्यांचा राजीनामा घेण्याची इच्छाशक्ती शिवसेना दाखवणार का, अशीही विचारणा त्यांनी केली.