मुंबई: सांगलीतील अनिकेत कोथळे हत्याप्रकरणात राज्य सरकार विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा विचार करत असल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. तसेच अनिकेत कोथळेच्या कुटुंबियांना सरकारकडून १० लाख रुपयांची मदत जाहीर करत असल्याचे त्यांनी सांगितले.
सांगलीत चाकूचा धाक दाखवून लुटल्याप्रकरणी अटक केलेल्या अनिकेत कोथळे या आरोपीचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. पुरावा नष्ट करण्यासाठी विश्रामबाग पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे आणि त्यांच्या साथीदारांनी अनिकेतचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला अनिकेत पळाल्याचा बनाव पोलिसांनी रचला. मात्र, सखोल चौकशीत पोलिसांचे बिंग फुटले आणि युवराज व अन्य पाच पोलिसांची रवानगी पोलीस कोठडीत झाली.
जनतेच्या सुरक्षेची जबाबदार असलेले पोलिसच गुन्हेगार झाल्याने सांगलीत संतापाची लाट उसळली. सोमवारी सांगलीत बंद पाळण्यात आला. दुसरीकडे मुंबईत गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद देऊन कोथळे कुटुंबियांना मदत जाहीर केली. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. युवराज कामटे गुन्हा घडला त्या कालावधीत कुठे कुठे गेले याचा सखोल तपास केला जाईल, तसेच पोलीस कोठडीतील नियमांबाबत आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. या प्रकरणातील काही अधिकाऱ्यांची बदली करण्याची तसेच सीबीआय चौकशीची मागणीही जोर धरु लागली आहे. याबाबत केसरकर म्हणाले, या प्रकरणाचा तपास २४ तासांत लागला असून सध्या तपास योग्य दिशेने सुरु आहे. जर सीआयडीचा तपास पुढे सरकला नाही तर सीबीआयचा विचार होतो, असे त्यांनी स्पष्ट केले. याप्रकरणातील साक्षीदार अमोल भांडारे आणि पीडित कोथळे कुटुंबीय यांना संरक्षण दिले जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.