Placeholder canvas
Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रहिंदुत्ववादी संघटनांकडून मुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका - प्रकाश आंबेडकर

हिंदुत्ववादी संघटनांकडून मुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका – प्रकाश आंबेडकर

मुंबई – सरकारचे कोणतेही नियंत्रण नसलेल्या हिंदुत्ववादी संघटनांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवाला धोका आहे. अशी धक्कादायक माहिती आज भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रावसाहेब पाटिलची सोशल मीडियावरील पोस्ट
शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्या जवळच्या असलेल्या रावसाहेब पाटील या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी अत्यंत आक्षेपार्ह आणि चिथावणीखोर पोस्ट सोशल मीडियावर टाकली आहे. त्यात मुख्यमंत्र्याना बिनदास्त कापू शकता, अशी पोस्ट टाकली आहे. त्यामुळे राज्यात मुख्यमंत्री सुरक्षित नसून त्यांनी या पोस्ट टाकणाऱ्या आणि जवळचा संबंध असलेल्या संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करावी, आणि इतकी गंभीर माहिती ज्या पुणे पोलीस आयुक्त आणि इतर महत्वाच्या अधिकाऱ्यानी दिली नाही, त्यांच्यावरही कारवाई करावी अशी मागणी अॅड. आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
रावसाहेब पाटील यांनी केलेल्या पोस्टची माहिती आणि त्याची कागदपत्रे आंबेडकर यांनी माध्यमाच्या समोर देत राज्यात अनियंत्रित झालेल्या हिंदुत्ववादी संघटनातुन उद्या हाफिज सईदसारखे लोक तयार होत असून त्यावर सरकारने कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली.
कोरेगाव-भीमा येथे मोठ्या प्रमाणात कत्तली करण्याचे आणि त्यानंतर तिथे जर काही डोके कमी पडले तर मंत्री गिरीश बापट, सुधींद्र कुलकर्णी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही बिनधास्त कापू शकता, माझी काही हरकत नसेल हे लोक देशाला आणि महाराष्ट्राला लागलेली कीड आहेत, अशी अत्यंत आक्षेपार्ह आणि चिथावणीखोर पोस्ट रावसाहेब पाटील या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी टाकली आहे.
सरकारने आत्तापर्यंत कोंबिंग ऑपरेशनच्या माध्यमातून ३००० जणांवर कारवाई केली आहे. कोंबिग ऑपरेशन थांबविण्याचे मुख्यमंत्र्यानी आदेश दिलेले असतानाही भिवंडी, निलंगा, कंधार, नांदेड, पुणे आदी ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली असून या कोंबिंग ऑपरेशन विरोधात आम्ही उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती आंबेडकर यांनी दिली. सरकारने भिडे-एकबोटेवर लवकर कारवाई केली नाही तर आपण लवकरच दिल्लीत एक पत्रकार परिषद घेऊन मोठा खुलासा करणार असल्याचा इशारा आंबेडकर यांनी दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments