Wednesday, June 26, 2024
Homeमहाराष्ट्रपरिवहन खात्याच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याला निलंबित करण्याऐवजी शिवसेनेने त्याच्याकडून प्रेरणा घ्यावी!: विखे पाटील

परिवहन खात्याच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याला निलंबित करण्याऐवजी शिवसेनेने त्याच्याकडून प्रेरणा घ्यावी!: विखे पाटील

मुंबई: परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांना राजीनामे खिशात घेऊन फिरणारी शिवसेना समजून त्यांचा अंत बघू नका. खात्याचा गाडा हाकता येत नसेल तर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी चालते व्हावे, असे खडे बोल सुनावणारे परिवहन खात्याचे कर्मचारी शरद जंगम यांना निलंबित करण्याऐवजी शिवसेनेने त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी, अशी मार्मिक टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

परिवहन मंत्र्यांविरूद्ध फेसबुकवर मत व्यक्त केल्याबद्दल इस्लामपूर, जि. सांगली येथील डेपोमध्ये कार्यरत वर्कशॉप मेकॅनिक शरद जंगम यांना निलंबित करण्याच्या घटनेबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, सरकारी कर्मचाऱ्यांनी सार्वजनिकरित्या सरकारवर टीका करू नये, असा नियम आहे. मात्र एसटी कर्मचाऱ्यांवर ही वेळ का ओढवली, याचाही सरकारने विचार केला पाहिजे. एसटी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसाठी आंदोलन केले म्हणून त्यांच्याविरूद्ध सरकारचा राग आहे. निवृत्त कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले म्हणून त्यांच्या सवलतीत कपात करून सरकारने आपली सूडबुद्धी दाखवून दिली आहे. अशा परिस्थितीत एका कर्मचाऱ्याने आपला संताप सोशल मीडियावर व्यक्त केला म्हणून त्याच्यावर कारवाई करताना सरकारने आपलेही काही चुकले आहे का, याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे.

आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरत नाही, या शरद जंगम यांच्या विधानाविषयी विखे पाटील म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जंगम यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपल्या खिशात कुजत पडलेले राजीनामे मुख्यमंत्र्यांच्या तोंडावर फेकले पाहिजे. शिवसेनेचे नेमके काय चुकतेय, ते जाहीरपणे सांगण्याचा स्वाभिमान आपल्या कर्मचाऱ्याने दाखवला, म्हणून रावतेंनी खरे तर जंगम यांचा जाहीर सत्कार करायला हवा होता. पण त्याऐवजी त्यांना निलंबित करण्याचे काम सरकारने केले आहे. सरकारने उदार मनाने शरद जंगम यांचे निलंबन तातडीने मागे घ्यावे आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात ठोस पावले उचलावीत. अन्यथा विरोधी पक्षांना शरद जंगम यांच्या पाठीशी उभे रहावे लागेल, असा इशाराही राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments