Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रगुंडाकडून पोलिसाची डोक्यात दगड घालून हत्या!

गुंडाकडून पोलिसाची डोक्यात दगड घालून हत्या!

नांदेड नांदेडमधील एका कुख्यात गुंडाने भरदिवसा एका पोलीस कर्मचाऱ्याची त्याच्या घरासमोरच डोक्यात दगड घालून हत्या केली. शिवाजी पुंडलिकराव शिंदे (वय ४७) असे मृत पोलिसाचे नाव असून ते स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत होते. तर तुलजीतसिंग कन्हैय्यासिंग ठाकूर असे खून केलेल्या गुंडाचे नाव आहे. तुलजीतसिंग पसार झाला असून हत्येचा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हा प्रकार आज (रविवारी) नांदेड शहरातील दत्तनगर भागात शिंदेंच्या घरासमोरच घडला.

घटनेची अधिक माहिती अशी, शिंदे दत्तनगरातील आपल्या घराजवळ आले असताना तुलजीतसिंगने त्यांच्या डोक्यात दगड घातला. यात शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. शिंदे यांची हत्या केल्यानंतर तुलजीतसिंगने एका दुचाकीस्वाराला लिफ्ट मागून घटनास्थळावरून काढता पाय घेतला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. तुलजीतसिंगवर विविध गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे दाखल करण्यामागे शिंदे यांचाच हात असल्याच्या समजातून त्याने ही हत्या केल्याचे बोलले जात आहे. शिंदे हे गेल्या २५ वर्षांपासून पोलीस दलात कार्यरत होते. ते मुळचे कंधार तालुक्यातील हाळदा येथील रहिवासी आहेत. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुली आणि मुलगा असा परिवार आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments