Placeholder canvas
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्र‘ओखी’ चक्रीवादळ काय आहे जाणून घ्या

‘ओखी’ चक्रीवादळ काय आहे जाणून घ्या

मुंबई: केरळ, तामिळनाडू, लक्षद्वीप भागात थैमान घातल्यानंतर ओखी चक्रीवादळ गुजरात आणि महाराष्ट्राच्या दिशेने पुढे सरकले आहे. याचा परिणाम मुंबईतही जाणवू लागला आहे. सोमवारी संध्याकाळपासूनच मुंबईमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. तर नवी मुंबईमध्ये मंगळवारी गारांचा पाऊस झाला. ओखी चक्रीवादळामुळे मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र या भागांत येत्या २४ तासांत आणखी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. समुद्रकिनाऱ्याजवळील परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

 ‘ओखीनाव आलं कुठून?
‘ओखी’चा बंगाली भाषेत अर्थ होतो डोळा. बांगलादेशनं या चक्रीवादळाला ओखी असं नाव दिलं आहे. २००० पासून उष्णकटिबंधीय वादळांना नाव देण्याची पद्धत रुढ झाली आहे. हिंदी महासागरात म्हणजे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील वादळांना ‘उष्णकटिबंधीय वादळं’ म्हटलं जातं. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं त्याचं रुपांतर ओखी चक्रीवादळात झालं आहे.

नाव देण्याची पद्धत कशी असते?
जसं हे वादळ जागा बदलतं तसं या चक्रीवादळांना वेगवेगळं नाव दिलं जातं. भारतीय उपखंडातील वादळांसाठी भारत, बांगलादेश, पाकिस्तान, मालदीव, ओमान, श्रीलंका, म्यानमार आणि थायलंड या आठ देशांनी वादळांची नावं ठरवली आहेत. भारताकडून ‘अग्नी’, ‘आकाश’, ‘बिजली’, ‘जल’, ‘लहर’, ‘मेघ’, ‘सागर’ आणि ‘वायू’ अशी आठ नावं सुचवली गेली. इतर राष्ट्रांकडूनही प्रत्येकी आठ अशी ६४ नावं देण्यात आली. ही नावं ओळीनं देण्यात येतात. याच पद्धतीनं पृथ्वीवरच्या इतर भागातील वादळांची नावं ठरवली जातात. विशिष्ट भागात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा धोका ज्या ज्या देशांना बसण्याची शक्यता असते ते सर्व देश एकत्र येऊन वादळांच्या नावांची यादी तयार करतात. फुले, नद्या, विशेष शब्द, प्राणी यांची नावे वादळांना दिली जातात.

यापूर्वी चक्रीवादळाचं नाव काय होतं?
यापूर्वी ओखी या चक्रीवादळाचं नाव ‘मोरा’ होतं. हे नाव थायलंडकडून देण्यात आलं होतं. ओखीचं पुढचं नाव हे ‘सागर’ असेल. हे नाव भारताकडून या चक्रीवादळाला देण्यात येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments