गुजरात: ओखी वादळाने गुजरातच्या निवडणूकीत प्रचाराचा रसभंग केला आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या आज तीन सभा होत्या. तर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या चार सभा होत्या. सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचार सभा आज रद्द करण्यात आल्या.
राजुला, महुवा आणि शिहोर इथे अमित शहांच्या सभा होणार होत्या. या सभा रद्द करण्यात आल्या आहेत. राजुला अमरेली जिल्ह्यात आहे, महुवा भावनगर जिल्हयात आहे तर शिहोरही भावनगर जिल्ह्यात आहे.केरळमध्ये धुमाकूळ घालणारं ओखी वादळ आता महाराष्ट्र आणि् गुजरातच्या किनारपट्टीवर धडकलं आहे. यामुळे मुंबई आणि कोकण किनारपट्टीला धोका उरलेला नाही. कारणं हे वादळ गुजरातकडे सरकलं आहे. या वादळामुळे मुंबईत पाऊस होतो आहे. ऐन गुजरातच्या निवडणुकांच्या तोंडावर हे वादळ आता गुजरातच्या सीमेवर धडकलं आहे. गुजरातमध्ये ९ डिसेंबरला मतदान होणार आहे. मतदानाच्या वेळी अशीच परिस्थिती राहिली तर त्याचा फटका राजकीय पक्षांना बसू शकतो. अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.