Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रआज सुपरमून, ब्लू मून व ब्लड मून बाबत सोशल मीडियावर अंधश्रध्देचे भुत

आज सुपरमून, ब्लू मून व ब्लड मून बाबत सोशल मीडियावर अंधश्रध्देचे भुत

मुंबई: नवीन वर्षाच्या महिन्याचा शेवट तीन खगोलीय घटनेने होणार आहे. सुपरमून, ब्ल्यू मून, चंद्रग्रहण (ब्लड मून) या तिन्ही खगोलीय घटना एकसाथ होणे हा एक दुर्मिळ योगायोग असतो. हा योग जळगावकरांना पाहण्याची संधी एम. जे. कॉलेजच्या भूगोल विभाग व खगोल अभ्यासक मंडळाने उपलब्ध करून दिली आहे. आज (दि. ३१) सायंकाळी ६ वाजता भूगोल विभागाच्या गच्चीवर १२ इंची टेलिस्कोपच्या माध्यमातून हे क्षण टिपता येणार आहे.
खग्रास चंद्रग्रहण (ब्लड मून) आज (दि. ३१) खग्रास चंद्रग्रहण बघायला मिळणार आहे. मात्र काही तथाकथित मंडळींकडून या बाबत अंधश्रध्दा पसरवुन नागरिकांच्या मनात भीती निर्माण करण्याचे काम सोशल मीडियावर जोरात सुरु आहे.

चंद्र आधी पृथ्वीच्या विरळ सावलीला ४ वाजून २१ मिनिटांनी स्पर्श करेल. त्यानंतर ५ वाजून १८ मिनिटांनी पृथ्वीच्या गडद सावलीला स्पर्श करेल आणि खग्रास चंद्रग्रहणाला सुरुवात होईल. संध्याकाळी चंद्र ६ वाजून १३ मिनिटांनी उगवेल तो ग्रहण लागलेल्या स्थितीतच आपल्याला हे ग्रहण आर्धेच दिसणार आहे, अशी माहिती खगोल अभ्यासक मंडळाने दिली. संपूर्ण ग्रहण काळ ५ तासांचा असेल तो ४ वाजून २१ मिनिटांनी सुरू होऊन ९ वाजून ३८ मिनिटांनी संपेल. तरी सर्वांनी कोणतेही समज-गैरसमज मनात न ठेवता या खगोलीय घटनेचा आनंद घ्यावा, असे भुगोलविभाग प्रमुख डॉ. प्रज्ञा जंगले व खगोल अभ्यासक अमोघ जोशी यांनी सांगितले आहे.

सूपरमून म्हणजे काय?
चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची कक्षा गोल नसून थोडी लंबवर्तुळाकार (अंडाकृती) आहे. त्यामुळे चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर रोज बदलत असते. चंद्राचे पृथ्वीपासूनचे सरासरी अंतर ३ लाख ८४ हजार किमी आहे. चंद्र कक्षेत फिरताना पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो, त्यावेळी त्याचे अंतर ३ लाख ५६ हजार असते. याला पेरिगी बिंदू म्हणतात. या बिंदूजवळ पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आल्यास त्याचा आकार नेहमीपेक्षा १४ टक्क्यांनी मोठा आणि ३० टक्क्यांनी जास्त प्रकाशित दिसतो या खगोलीय घटनेला ‘सुपरमून’ म्हणतात. ‘ब्लू मून’ हे वाचून आपल्याला असे वाटेल की यादिवशी चंद्र निळ्या रंगात दिसेल. पण तसे ननसून, चंद्राला स्वतःचा असा कोणताही रंग नाही. ज्यावेळी योगायोगाने एकाच महिन्यात दोन पौर्णिमा येतात, त्यावेळी दुसऱ्या पौर्णिमेला ‘ब्ल्यू मून’ म्हणतात.

असे होते चंद्रग्रहण…
अवकाशात पृथ्वीच्या दोन सावल्या पडतात गडद सावली आणि विरळ सावली चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची कक्षा आणि पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा यांच्यात ५ अंशाचा कोन आहे. चंद्राची कक्षा आयनिक वृत्ताला दोन ठिकाणी छेदते त्यांना राहू आणि केतू असे म्हणतात. चंद्राच्या कक्षेत आणि आयनिक वृत्त याच्यात असलेल्या कोनामुळे प्रत्येक पौर्णिमेला चंद्र या बिंदूंवर असतोच असे नाही कारण हे दोन्ही बिंदूसुद्धा फिरत असतात. ज्यादिवशी पृथ्वी आणि सूर्य यांना जोडणाऱ्या रेषेवर राहू किंवा केतू हे बिंदू असताना तेथे चंद्र आला तर तो पृथ्वीच्या दाट सावलीत सापडतो आणि खग्रास चंद्रग्रहण पाहायला मिळते. ज्यावेळी तो या बिंदूंच्या फार वर किंवा फार खाली असेल तर त्यावेळी तो पृथ्वीच्या विरळ सावलीतून जातो या ग्रहणाला ‘छायाकल्प चंद्रग्रहण’ म्हणतात. ज्यावेळी तो या बिंदूंच्या थोडा वर किंवा खाली असतो त्यावेळी चंद्राचा काही भागच दाट सावलीतून जातो यावेळी होणाऱ्या ग्रहणाला ‘खंडग्रास चंद्रग्रहण’ म्हणतात.

सोशल मीडियावर अशा प्रकारचे संदेश पसरवुन अंधश्रध्दा पसरविण्याचे काम सुरु आहे…..

भोजन करू नये, ग्रहण स्पर्श ते मोक्ष  काळात मल- मूत्र विसर्जन,

भोजन, अभ्यंगस्नान,झोप, काम

विषयक सेवन शक्यतो टाळावे.

नदीत स्नान शुभ मानले जाते. यथा

शक्ती स्नान कुठच्याही नदीत गंगा

समजून करावी.मोक्षा नंतर च स्नान करावे.

ग्रहण कालावधीत काय करावे?

स्नान,दान,होम,तर्पण,श्राद्ध,मंत्र पुर्शचरण करावे .,ग्रहण लागण्याच्या सुरूवातीलाच दर्भ व तुलसीपत्र वापरले तर दोष लागणार नाहीत.

ग्रहणाबाबतीत बरेच गैरसमजुती आहेत.ग्रहण लागताच वेध लागते.त्यामुळे काहीच करु नये. हे खरेही आहे म्हणून काय करावे काय करु नये हे मी सांगण्याचा प्रयत्न करतो.

१) ग्रहणात स्नान करुन पुजा,पाठ करावेत,मंत्र जप करावा.

२)ग्रहण काळात झोपू नये

३)घराची साफ सफाई करू नये.

४) गर्भवती स्त्रियांनी  देवाची उपासना करावी.जप करावा.घरातून बाहेर जाऊ नये.व ग्रहण काळी काहीही खाऊ नये.नाहीतर बाळाला शारीरिक त्रास होतो.

५) ग्रहण संपल्यानंतर घरात गंगाजल शिंपडावे त्यानंतर काहीतरी गोड बनवून देवाला नैवेद्य दाखवावा व नंतर जेवण करावे.

६)ग्रहणकाळात कोणाशीही भांडण करु नका.शांत रहा,ध्यान करा,गप्प बसा

७) ग्रहणकाळात झोपू नका नाहीतर रोग पकडतो.

८) ग्रहणकाळात लघुशंका, लघवी करु नये,घरात दरिद्रता येते.सावध रहा.

९) ग्रहणकाळात जो शौचास जातो त्यास पोटाचे विकार होतात.

१०) ग्रहणकाळात संभोग करु नये.नाहीतर डुक्कराच्या योनीत जन्म येतो.

११) ग्रहणकाळात चोरी, फसवणे,करु नका नाहीतर सर्पयोनीत जन्म घ्यावा लागेल.

१२) ग्रहणकाळात जीवजंतू व कोणाची हत्या करु नका.नाहीतर अनेक योनींत भटकावे लागेल.

१३) ग्रहणकाळात भोजन,माॅलीश करु नका,नाहीतर अनेक रोग शरीराला जखडतील.

१४) ग्रहणकाळात मौन पाळा,जप करा,ध्यान करा.याचे फल लाख पटीने आहे.

१५) ग्रहणकाळात सर्व कामे सोडून मौन व जप करा हे फार महत्त्वाचे आहे.

१६)सत्य ग्रहणशक्ती अगोदर खावून-पिऊन घ्यावे पण बाथरूम ला जावे लागेल असे घेऊ नये.

१७) नशापाणी,घाणेरडे वागणे करु नये.स्वैयपाक करु नये.धुने धुवू नये.पाणी भरु नये,

१८) भगवान  ग्रहणकाळात भ्रूमध्यामध्ये ध्यान करावे.मुले बुद्धिमान होतात.

ग्रहणकाळात काय करावे काय करु नये ही माहिती मी दिली आहे.ही लक्षात ठेवा.हे सर्व शास्त्र परिहार आहे.यातून कोणतीही सूट नाही.

या सर्व गोष्टींना विज्ञानात कोणतेही प्रमाण नाही. अंधश्रध्दा पसरवुन काही मंडळी आपली राजकीय दुकानदारी चालवत आहेत. तर शासन एकीकडे अंधश्रध्दे विरुध्द एकीकडे कायदे करत आहेत तर दुसरीकडे तथाकथित बुवा,बाबा नागरिकांची दिशाभूल करत आहेत. अशा मंडळींकडून सावध राहण्याची गरज आहे असे तज्ञांचे मत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments