मुंबई, राज्यातील सर्व कर्जदार शेतकरी ज्यांनी कर्जमाफीसाठीच्या निकषानुसार अर्ज दाखल केले आहेत त्यांना येत्या दहा ते बारा दिवसांत त्यांच्या खात्यांवर पैसे जमा करून निश्चितपणे दिलासा दिला जाईल, अशी ग्वाही पणन आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिली. ते बँकांच्या अधिका-यांशी बैठक झाल्यानंतर बोलताना देशमुख म्हणाले की, बँकांच्या अधिका-यांशी राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अधिका-यांनी समन्वय न ठेवल्याने काही तांत्रिक अडचणी राहिल्या तरी येत्या दहा बारा दिवसांत पैसे खात्यात देण्याची प्रक्रीया वेगाने सुरू होईल.
दरम्यान कर्जमाफीच्या मुद्यावर ज्येष्ठ मंत्र्याच्या तक्रारी काल प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सहकार मंत्री देशमुख यांना धारेवर धरत आज तातडीची बैठक घेतली. या राज्यस्तरिय बँकर्स समितीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत झाली. शेतक-यांच्या कर्जमाफीतील यादीत बँकांनी दिलेल्या माहितीत काही त्रुटी आढळून आल्याने त्यावर तात्काळ मार्ग काढण्यासाठी ही बैठक होती. एकही पात्र शेतकरी या लाभापासून वंचित राहू नये आणि त्याचवेळी जनतेचा पैसा चुकीच्या लोकांच्या हाती जाऊ नये, यादृष्टीने हे नियोजन होते. या यादीत असलेल्या त्रुटी दूर सारण्यासाठी माहिती-तंत्रज्ञान विभाग तसेच संबंधित बँकांच्या चमू गठीत करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.या सर्वांनी युद्धपातळीवर काम करून या त्रुटी दूर कराव्यात आणि उद्यापासून शेतक-यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया प्रारंभ करावी,असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले. व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या मदतीने विविध जिल्हास्थानी सुद्धा बँक प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. त्यांच्या शंकांचे मुख्यमंत्र्यांनी उत्तरे देऊन समाधान केले. वित्त आणि सहकार विभागाचे अधिकारी सुद्धा या बैठकीला विशेष करून उपस्थित होते.