मुंबई: राज्यात कर्जमाफीच्या यादीचा घोळ मिटता मिटत नसल्याचं अजूनही चित्र आहे. मात्र या सर्वाला राष्ट्रीयकृत बँकाच जबाबदार असल्याचं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आपल्याकडूनच घाई झाल्यामुळे कर्जमाफीला उशीर झाला अशी कबुली दिली.
कोल्हापूर जिल्ह्यातील बिद्री साखर कारखान्याच्या संचालकांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी कर्जमाफी उशिराला बँकावर खापरं फोडलं. सरकारने कर्जमाफीच्या सर्व रकमेची तरतूद केली आहे. मात्र, राष्ट्रीयकृत बँकांनी एकच आधार क्रमांक हजारो शेतकऱ्यांच्या नावावर टाकून मोठा घोळ घातला आहे. त्यामुळे मोठी तांत्रिक अडचण झाली आहे. मात्र, त्यावरही मात केली जाईल त्यासाठी कोणत्या आंदोलनाची गरज नसल्याचं नमूद करत या मुद्द्यावरून आंदोलनांच्या पवित्र्यात असलेल्याना फटकारलंय.
दरम्यान, बिद्री कारखान्यावर सत्ता मिळवल्यानंतर झालेल्या विजयी मेळाव्यात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी साखर उत्पादकांना यावर्षी चांगला दर मिळेल अस स्पष्ट केलंय. ७० – ३० च्या फॉर्म्युल्यानुसार कारखान्यांनी दर देणे बंधनकारक असून न देणाऱ्यावर कारवाई करण्याची शासनाची भूमिका आहे. त्यामुळे यावर्षी ऊस आंदोलनाची स्थिती निर्माण होणार नसल्याचं त्यानी स्पष्ट केलंय.