चेन्नई : दाक्षिणात्य सिनेमातील महानायक अर्थात सुपरस्टार रजनीकांत यांनी सुपरस्टार विजयच्या ‘मर्सल’ सिनेमाचं कौतुक केलं आहे. अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याला सिनेमातून हात घालण्यात आल्याचं रजनीकांत यांनी ट्विटरवरुन म्हटलं आहे.
‘मर्सल’ सिनेमातीलच काही संवादांवर तामिळनाडूतील भाजप नेत्यांनी आक्षेप घेतला होता. जीएसटी, डिजिटल इंडिया, नोटाबंदी या मुद्द्यांवरील संवादांवर तामिळनाडू भाजपने आक्षेप नोंदवत ते सीन कापण्यासाठी आक्रमक पवित्राही घेतला होता. त्यावरुन तामिळनाडूत मोठा वादंग माजला आहे.
Important topic addressed… Well done !!! Congratulations team #Mersal
— Rajinikanth (@superstarrajini) October 22, 2017
आता सुपरस्टार रजनीकांत यांनीच सिनेमाचं कौतुक केले आहे.
‘मर्सल’ हा सिनेमा औषधांच्या माफियाराजवर भाष्य करतो. ‘सिगापूरमध्ये 7 टक्के जीएसटी असूनही आरोग्यसेवा मोफत आहे. मात्र भारतात २८ टक्के जीएसटीनंतर आरोग्यसेवा मोफत नाही’, या संवादावर भाजपने आक्षेप घेतला आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शक अॅटली यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केले असून, विजय आणि अॅटली या जोडीने ‘थेरी’ हा सुपरहिट सिनेमाही याआधी केला आहे. बॉक्सऑफिसवरही सध्या ‘मर्सल’ दमदार कमाई करताना दिसतो आहे.