Saturday, November 9, 2024
Homeदेशशिया आणि सुफी नेते गुजरातमध्ये करणार भाजपचा प्रचार

शिया आणि सुफी नेते गुजरातमध्ये करणार भाजपचा प्रचार

नवी दिल्ली. गुजरातचा गड कायम राखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहांनी कंबर कसली आहे. पटेल, ओबीसी, दलित नेत्यांनी भाजपविरोधात वातावरण तापवल्यामुळे आता भाजपने मुस्लिम मतांकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे आता अनेक मुस्लिम धर्मगुरु भाजपच्या प्रचारात उतरणार आहेत. उत्तर प्रदेश आणि देशाच्या इतर भागांमधील सुफी आणि शिया धर्मगुरु गुजरातमध्ये भाजपसाठी मतांचा जोगवा मागताना दिसणार आहेत. नवभारत टाईम्सने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

मुस्लिम धर्मगुरु ३५ ते ४० विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचा प्रचार करणार आहेत. या मतदारसंघामध्ये मुस्लिमांची संख्या जास्त असून येथील निकालात ही मते निर्णायक ठरु शकतात. शिया आणि सुफी समाज भाजपचा सहानभुतीदार मानला जातो. भाजपच्या उत्तर प्रदेशमधील ऐतिहासिक विजयात शिया आणि सुफी समुदायाच्या मतांची भूमिका महत्त्वाची होती. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये यशस्वी ठरलेली रणनिती भाजपकडून गुजरातमध्ये वापरली जात आहे.

शिया आणि सुफी समाजाचे धर्मगुरु गुजरातमधील प्रचारादरम्यान उत्तर प्रदेशमधील भाजपच्या कामांचा प्रचार करणार आहेत. देशाच्या इतर भागांमधील मुस्लिम समुदायाचे नेतेही गुजरातमध्ये प्रचार करायला येऊ शकतात, अशी माहिती भाजपच्या एका नेत्याने दिली. मात्र भाजपच्या अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष सुफी महबूब अली चिश्तींनी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अद्याप कोणत्याही शिया किंवा सुफी धर्मगुरुला निमंत्रित करण्यात आले नसल्याचे सांगितले. मात्र एखाद्या व्यक्तीला भाजपच्या प्रचारासाठी यायचे असल्यास, त्या व्यक्तीला ते स्वातंत्र्य आहे, असेही ते म्हणाले.

१५ नोव्हेंबर रोजी एका सुफी संस्थेकडून हिंदू धर्माच्या आणि सुफी समुदायाच्या नेत्यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक शांतीचा संदेश देण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली आहे. ही रॅली कोणत्याही पक्षाची किंवा राजकीय कारणांसाठी नसेल, असा दावाही संस्थेकडून करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments