skip to content
Friday, May 17, 2024
Homeदेशसीमेवर पाकिस्तानच नव्हे तर भारतही करतंय गोळीबार: फारुख अब्दुल्ला

सीमेवर पाकिस्तानच नव्हे तर भारतही करतंय गोळीबार: फारुख अब्दुल्ला

भारत: पाकिस्तान सीमेवर तणाव निर्माण झाला असतानाच जम्मू- काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सपक्षाचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी वादग्रस्त विधान केले आहे. सीमेवर फक्त पाकिस्तानच गोळीबार करतंय का?, आपणही गोळीबार करतो. शस्त्रसंधीचे उल्लंघन भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडून होतंय, असे फारुख अब्दुल्लांनी म्हटले आहे.

भारत- पाकिस्तानमधील तणाव वाढला असून सीमेवर पाकच्या कुरापती सुरुच आहेत. पाकिस्तानच्या गोळीबारामुळे सीमेलगतच्या शाळा तीन दिवस बंद ठेवण्यात आल्या आहेत. पाकच्या गोळीबारात चार जवानही शहीद झाले आहेत. जम्मू- काश्मीर विधानसभेतही पाकिस्तानचा निषेध करण्यात आला. मात्र नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी याबाबत वादग्रस्त विधान करुन आगीत तेल ओतण्याचेच काम केले. ते म्हणाले, शस्त्रसंधीचे उल्लंघन फक्त पाकिस्तानच करतोय असं नाही. तर गोळीबार भारताकडूनही सुरु आहे. यामुळे सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पण युद्ध हा वादावरील तोडगा नाही. यावर फक्त चर्चेद्वारेच तोडगा काढता येईल, असे फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. अब्दुल्ला यांच्या विधानाचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटण्याची चिन्हे आहेत.

फारुख अब्दुल्ला यांनी भारत- पाकसंबंधावर वादग्रस्त विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये फारुख अब्दुल्लांनी पाकव्याप्त काश्मीर (पीओके) हा पाकिस्तानचा भाग असून पीओकेला पाकपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे विधान केले होते. ‘पाकव्याप्त काश्मीरमध्ये तिरंगा फडकवण्याची भाषा करणाऱ्या मोदी सरकारने आधी श्रीनगरच्या लाल चौकात राष्ट्रीय ध्वज फडकवून दाखवावा, असे आव्हानच त्यांनी दिले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments