शिमला – हिमाचल प्रदेशातील एकूण ६८ जागांसाठी आज मतदान होणार आहे. प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे. निवडणूक आयोगाने पूर्ण तयारी केली असून, सकाळी ८ वाजल्यापासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रत्यक्ष मतदान होणार आहे. एकूण ७ हजार ५२५ मतदान केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत.
विधानसभेच्या ६८ जागांसाठी तब्बल ३३८ उमेदवार मैदानात उतरले आहेत. राज्यातील सुमारे ५० लाख मतदार आज आपल्या प्रतिनिधीची निवड करणार आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसही उतरली असून, दोन जागांवर राष्ट्रवादीने उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष सर्वच अर्थात ६८ जागांवर निवडणूक लढवत आहे. तिसऱ्या क्रमांकावर बहुजन समाजवादी पक्ष असून, बसपने ४२ जागांवार उमेदवर उभे केले आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने १४ तर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने (सीपीआय) ३ उमेदवार उभे केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचे प्रत्येकी २ उमेदवार मैदानात आहेत. ३३८ उमेदवारांपैकी ३१९ उमेदवार पुरूष आहेत. तर केवळ १९ उमेदवार स्त्रिया आहेत. राज्यातील एकूण मतदारांची संख्या ५० लाख ४५ हजार ९४१ असून, त्यात २५ लाख ६८ हजार ७६१ पुरूष आहेत. तर २४ लाख ५७ हजार १६६ स्त्री आहेत.