नवी दिल्ली: रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आम आदमी पक्षाची राज्यसभेची ऑफर नाकारली आहे. आम आदमी पक्षाने राजन यांना काही दिवसांपूर्वीच राज्यसभेच्या उमेदवारीबद्दलचा प्रस्ताव दिला होता. याबद्दल माध्यमांनी राजन यांना विचारले असता, सध्या शिक्षणाशी संबंधित कामात व्यग्र असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. एका पत्रकातून राजन यांनी राज्यसभेच्या खासदारकीच्या प्रस्तावावर प्रतिक्रिया दिली.
शिक्षण कार्याला स्वल्पविराम देण्याची सध्या राजन यांची इच्छा नाही. त्यामुळेच त्यांनी राज्यसभेवर जाण्यास नकार दिला आहे. ‘सध्या राजन भारतातील अनेक शैक्षणिक कार्यांमध्ये व्यग्र आहेत. याशिवाय ते शिकागो विद्यापीठात पूर्णवेळ अध्यापनाचे काम करतात,’ असे राजन यांच्यावतीने जारी करण्यात आलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. आपकडून जानेवारी महिन्यात तीन जणांना राज्यसभेवर पाठवण्यात येणार आहे. यातील एका जागेसाठी आपकडून राजन यांना विचारण्यात आले होते. आपला सध्या गटबाजीचे ग्रहण लागले आहे. राज्यसभेची खासदारकी मिळवण्यासाठीही सध्या पक्षात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळेच केजरीवालांकडून सध्या विविध क्षेत्रातील जाणकारांना संधी देण्याचा विचार केला जात आहे. पक्षातील नेत्यांना उमेदवारी देण्याऐवजी विविध क्षेत्रातील नामवंतांना राज्यसभेवर पाठवण्याचा केजरीवालांचा मानस आहे. त्यामुळेच आपकडून राजन यांना राज्यसभेचा प्रस्ताव देण्यात आला होता. आपकडून तीन जणांना राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते. त्यासाठी आवश्यक संख्याबळ पक्षाकडे आहे. मात्र आपमधील उत्सुकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. कुमार विश्वास यांनी केजरीवालांकडे राज्यसभेची उमेदवारी मागितली आहे. दिल्लीतील राज्यसभेच्या तीन जागांवरुन काँग्रेसचे जनार्दन द्विवेदी, डॉ. कर्ण सिंह आणि परवेझ हाश्मी यांना खासदारकी देण्यात आली आहे. या नेत्यांच्या खासदारकीचा कार्यकाळ जानेवारीत संपणार आहे. दिल्ली विधानसभेत आम आदमी पक्षाचे ६६ आमदार असल्याने या तिन्ही जागांवर आपचा विजय निश्चित आहे.