नवी दिल्ली: काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी टि्वटरवर विशेष सक्रीय झाले आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांचे टि्वट्स चर्चेचा विषय बनले आहेत. विरोधकांची त्यामुळे पाचावर धारण बसली आहे. परिणामी राहुल यांनी त्यांचे टि्वट्स लोकप्रिय होण्यासाठी बॉट्सचा वापर केल्याचाही आरोप करत भाजपने त्यांना टीकेचे लक्ष्य केले. राहुल यांनी या टीकेला खूप गंमतीशीर आणि अनोख्या प्रकारे प्रत्युत्तर दिले आहे.
राहुल गांधी यांनी रविवारी एक व्हिडिओ टि्वट केला. यात त्यांचा पाळीव कुत्रा दिसतोय. राहुल गांधींचा आवाज यात ऐकू येतो. ते कुत्र्याला सांगतात आणि त्याबरहुकुम तो कमालीच्या कसरती करतो. या व्हिडिओसोबत राहुल यांनी लिहीलंय ते त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांची पुरती खिल्ली उडवणारं आहे. ते लिहितात, (म्हणजे त्यांचा आवडता कुत्रा त्यांच्याऐवजी लिहितोय अशा पद्धतीने त्यांनी लिहीलंय) की – ‘लोक विचारत असतात की या माणसासाठी टि्वट कोण करतं. पाहा मी, पीडी, करतो. ‘टि्वट’साठी उप्स ‘ट्रीट’साठी पाहा मी काय करतो.’
Ppl been asking who tweets for this guy..I’m coming clean..it’s me..Pidi..I’m way 😎 than him. Look what I can do with a tweet..oops..treat! pic.twitter.com/fkQwye94a5
— Office of RG (@OfficeOfRG) October 29, 2017
राहुल गांधी यांचे टि्वटर हॅंडल रिटि्वट करण्यासाठी बॉट्सचा वापर केला जातो, असा आरोप त्यांच्यावर होत होता. त्याला त्यांनी अशा पद्धतीने विडंबनात्मक उत्तर दिले आहे.