Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeव्यापारपोलादपूरमध्ये विकायला येतेय रोज महाबळेश्वरची रसरशीत स्ट्रॉबेरी महाबळेश्वरच्या मालाला मुंबई गोवा राष्ट्रीय...

पोलादपूरमध्ये विकायला येतेय रोज महाबळेश्वरची रसरशीत स्ट्रॉबेरी महाबळेश्वरच्या मालाला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाढती मागणी

पोलादपूर (शैलेश पालकर)- मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर सध्या पोलादपूरमध्ये महाबळेश्वरची रसरशीत स्ट्रॉबेरी विकण्यासाठी दरवर्षीप्रमाणे काही शेतकरी घेऊन येऊ लागले आहेत. काही वर्षांपूर्वी तालुक्यातील मोरगिरी येथे स्ट्रॉबेरीची शेती करण्याचा प्रयोग यशस्वी होऊनही त्यामध्ये सातत्य ठेवणे शेतकऱ्यांना शक्य न झाल्याने अजूनही या घाटावरच्या महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीवरच पोलादपूरकरांना अवलंबून राहावे लागत आहे.

पोलादपूर तालुक्यात पावसाळयामध्ये अतिवृष्टी, हिवाळयात कडाक्याची थंडी आणि उन्हाळयामध्ये प्रचंड उष्णता असे तीनही ॠतू कमालीचे तीव्र स्वरूपात अनुभवावे लागत असतात. यामुळे प्रयोगशील शेतकऱ्यांना शेंगदाणा, हळद, बटाटे, कांदे अशी अपारंपरिक पिके घेण्यास संधी मिळते. मात्र, ही संधी यशस्वी करणारे शेतकरी या पिकांच्या उत्पादनामध्ये सातत्य ठेवत नसल्याचा अनुभव तालुक्यातील कृषी पर्यवेक्षकांना येत आहे. काही वर्षांपूर्वी मोरगिरी येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने दीड-दोन एकर शेतजमीनीवर स्ट्रॉबेरीची लागवड यशस्वी केली. मात्र, बाजारातील मागणी आणि महाबळेश्वर-पांचगणीच्या स्ट्रॉबेरी उत्पादनाशी स्पर्धा यामुळे त्या शेतकऱ्याला स्ट्रॉबेरी लागवडीचे सातत्य टिकविता आले नाही.

सध्या दरवर्षीप्रमाणे पोलादपूर एस.टी.स्थानक आणि पोलीस स्टेशनच्या परिसरातील मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गालगत रोज सकाळी महाबळेश्वर परिसरातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी रसरशीत लालचूटूक स्ट्रॉबेरी टोपल्यांमधून विकण्यासाठी घेऊन बसतात. सध्या प्रतिकिलो 100 ते 200 रूपये दर आहे आणि तरीही स्ट्रॉबेरीचे फळ काहीसे आंबट गोड असल्याने ग्राहकांकडून केवळ हौशीपोटी खरेदी केली जात आहे. शिमग्यापूर्वी या फळाची गोडी अवीट होऊन उत्पादन वाढून दरही कमी होत असल्याने या शेतकऱ्यांना सध्या केवळ बाजारपेठ व मागणी टिकवून ठेवण्यासोबत रोज उपलब्ध होणारी स्ट्रॉबेरीची फळे नासून जाण्यापूर्वी विकून प्रवासभाडे व चरितार्थ चालविण्यापुरती कमाई करण्यासाठीच धडपड करावी लागत आहे. दिवसभर विक्रीसाठी बसणे शक्य नसलेल्या काही शेतकऱ्यांकडून पोलादपूर येथील रवींद्र महाडीक, मयुरी मोरे आणि अन्य टपरीधारकांनी स्ट्रॉबेरी विकत घेऊन त्यांच्या पानाच्या टपरीसोबत स्ट्रॉबेरी विक्रीचा प्रयत्न चालविला आहे. एक शेतकरी जोडपेदेखील या परिसरामध्ये स्ट्रॉबेरी विक्री करण्यास बसत असते.

सध्या मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर केवळ पोलादपूर येथेच अशी रसरशीत लालचूटूक स्ट्रॉबेरी विक्रीस उपलब्ध असल्याने कोकणात जाणारे चाकरमानी आवर्जून आपल्या गाडया येथे थांबवून स्ट्रॉबेरीचा आस्वाद घेत आहेत. पुढील महिन्यापर्यंत ओठ जांभळे करणारा रानमेवादेखील दरवर्षीप्रमाणे विक्रीसाठी पोलादपूरला येणार असून येथून शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचे तोंड रंगविणारा मेवा हे आवडते खाद्य असल्याची माहिती यावेळी मयुरी महेंद्र मोरे यांनी दिली.

महाबळेश्वरची गाजरं, पुदीना तसेच अन्य पिकेदेखील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चाकरमान्यांना पोलादपूर येथून खरेदी करण्याची आवड असल्याचे यावेळी त्या म्हणाल्या. बाजारपेठेत स्ट्रॉबेरी, मेवा, गाजर व पुदीना या पिकांची मागणी असताना स्थानिक शेतकऱ्यांनी ही पिके घेतल्यास गुंतवणूक वसूल होऊन बऱ्यापैकी कमाईदेखील होऊ शकते, असा विश्वास यावेळी स्थानिक विक्रेत्या मयुरी मोरे यांनी व्यक्त केला आहे.

पोलादपूर तालुक्यातील केशकर्तनालयाचे दरपत्रक वधारलेय!

नववर्षानिमित्तची दरवाढ स्टाईलीश तरूणांसाठी ठरली खर्चिक

पोलादपूर (शैलेश पालकर)- तालुक्यातील नाभिक तरूण संघाने यावर्षी नववर्षानिमित्त दरपत्रक प्रत्येक केशकर्तनालयाला जारी केले असून ही दरवाढ नवनवीन हेअरस्टाईल कटींग करणाऱ्या तरूणांना खर्चिक ठरणारी आहे. मात्र, अत्याधुनिक केशकर्तनालयाच्या सुविधांमुळे ही दरवाढ अटळ असल्याचे नाभिक तरूण संघाचे अध्यक्ष विजय ग.पवार आणि सचिव सुरेश वि.पवार यांनी मत मांडले आहे

पोलादपूर तालुक्यात 1 जानेवारी 2019 पासून केस 50 रूपये, केसदाढी 90 रूपये, दाढी 40 रूपये आणि फोमदाढी 60 रूपये, लाईन कट 30 रूपये, स्पेशल दाढी 50 रूपये, दाढी कोरणे 40 रूपये, दहा वर्षांच्याआतील लहान मुलांचे केस कापणे 40 रूपये, बेबीकट 50 रूपये, सेटींग मशीन 50 रूपये, हेअरडाय 80 रूपये अशी सर्वसाधारण दरपत्रक असून फेशियल, चंदन, हेडमसाज, चेहरामसाज अशा विविध सुविधांसाठीही भरघोस वाढ करण्यात आली आहे. याखेरिज, घरी सेवेसाठी बोलविल्यास ग्राहकांना दुप्पट दरआकारणी करण्यात येणार असल्याचे या दरपत्रकात नमूद करण्यात आल्याने ही प्रथा यापुढे बंद होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

स्थानिक कारागिर मुंबई व शहरातील सलुनमध्ये नोकरीनिमित्त जात असल्याने त्यांचे मासिक पगार तसेच दुकानभाडे, विद्युतबील, एअरकंडीशन्ड सलुन या विविध बाबींचा विचारही या दरपत्रकानुसार केला जात असून बलुतेदारीसह जायवळ 251 रूपये आणि कार्यविधीचे दरही एकाकरीता 500 रूपये करण्यात आल्याने आता नाभिक तरूण संघाच्या कारागिरांना योग्य रोजगार प्राप्त होणार आहे, असे नाभिक तरूण संघाचे अध्यक्ष विजय ग.पवार आणि सचिव सुरेश वि.पवार यांनी सांगितले.

पोलादपूर येथे विद्युत सुरक्षा सप्ताहात एलऍण्डटीचे

कॉन्ट्रॅक्टर प्रकाश मेहता यांचे कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन

पोलादपूर (शैलेश पालकर)- तालुक्यातील विद्युत कर्मचारी ताणतणावरहित राहून पुर्ण कार्यक्षमतेने सक्रीय राहायचे असतील तर प्रत्येक कामांतील धोके आणि त्यावरील उपायांबाबत सतर्क राहणे आवश्यक असल्याचे मत एलऍण्डटीचे कॉन्ट्रॅक्टर प्रकाश मेहता यांनी व्यक्त केले.

पोलादपूर येथे विद्युत सुरक्षा सप्ताहप्रसंगी महावितरण आणि महापारेषण कंपन्यांचे अभियंता आणि कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचारी यांना मार्गदर्शन करताना सेवानिवृत्त सबॉर्डीनेट इंजिनियर प्रकाश मेहता यांच्यासमवेत कनिष्ट अभियंता सूद आणि माने यांच्यासह अजय सलागरे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी विद्युत सुरक्षा सप्ताहप्रसंगी सबॉर्डीनेट इंजिनियर कनिष्ट अभियंता सूद आणि माने यांचे तसेच सेवानिवृत्त सबॉर्डीनेट इंजिनियर प्रकाश मेहता यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सेवानिवृत्त सबॉर्डीनेट इंजिनियर प्रकाश मेहता यांनी विद्युत कर्मचाऱ्यांनी घ्यावयाची सुरक्षाविषयक काळजी आणि संभाव्य धोकेदायक प्रसंगी यासंदर्भात माहिती दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments