नवी दिल्ली: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने २०२१ मधले पहिले प्रक्षेपण यशस्वीरित्या केले आहे. रविवारी सकाळी १०.२४ वाजता श्रीहरीकोटा, सतीश धवन स्पेस सेंटर (एसडीएससी) येथून हे प्रक्षेपण झाले. चेन्नईपासून १०० कि.मी. अंतरावर असलेल्या आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा स्पेसपोर्टच्या प्रक्षेपण पॅडमधून प्रथमच भारतीय रॉकेट ब्राझीलच्या ६३७ किलो वजनाच्या अमेझोनिया -१ उपग्रहाचे प्रक्षेपण करत आहे.
या उपग्रहाला सतीश धवन उपग्रह किंवा एसडी सॅट असे नाव देण्यात आले असून ते २५,००० लोकांची नावे अंतराळात पाठवणार आहे. नॅनो सॅटेलाइटमध्ये भगवतगीतेची एक प्रत एसडी कार्डच्या रूपात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र वरच्या पॅनेलवर कोरले असून हा त्यांच्या आत्मनिर्भर भारत उपक्रमासाठी आणि अवकाश खासगीकरणासाठीच्या योजनेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा प्रयत्न आहे.
#WATCH ISRO's PSLV-C51 carrying Amazonia-1 and 18 other satellites lifts off from Satish Dhawan Space Centre, Sriharikota pic.twitter.com/jtyQUYi1O0
— ANI (@ANI) February 28, 2021
इस्रोचे अध्यक्ष डॉ. के शिवन आणि वैज्ञानिक सचिव डॉ. आर उमामहेश्वरन यांची नावे तळावरील पॅनेलवर कोरलेली आहेत. पीएसएलव्ही-सी ५१ रॉकेट हे पीएसएलव्ही (ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन) चे ५३ वे मिशन आहे, यात ब्राझीलचा अॅमेझोनिया -१ हा प्राथमिक उपग्रह आहे आणि इतर १८ पेलोड आहेत. आंध्र प्रदेशातील नेल्लूर जिल्ह्यातील श्रीहरिकोटा स्पेसपोर्टच्या पहिल्या लॉन्चपॅडवरून हे प्रक्षेपित करण्यात आले.
प्रक्षेपणानंतर ब्राझिलियन संघाचे अभिनंदन करताना इस्रोचे प्रमुख के शिवन म्हणाले की, “या मोहिमेमध्ये ब्राझीलच्या पहिल्या उपग्रहाचे प्रक्षेपण केले गेले याचा भारताला आणि इस्रोला अत्यंत अभिमान वाटतोय. उपग्रहाची योग्य स्थितीत आहे. मी ब्राझीलच्या संघाचे अभिनंदन करतो.”