महत्वाचे…
१.कल्याणच्या तिसगाव भागातील तिसाई मंदिरात २. मंदिरात गाऊन घालून प्रवेश केल्याचा जाब विचारल्याने महिलेला मारहाण ३. मारहाणीचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल
कल्याण : कल्याणमध्ये मंदिरात गाऊन घालून प्रवेश केल्याचा जाब विचारल्याने महिलेला मारहाण करण्यात आली आहे. मारहाण करणारी महिला पोलिस कर्मचारी असल्याची धक्कादयक माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे सर्वस्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
कल्याणच्या तिसगाव भागातील तिसाई मंदिरात काल (मंगळवारी) रात्री सातच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. कल्याण पूर्वेतल्या या मंदिरात महिलांनी गाऊन घालून जाऊ नये असा नियम आहे. तरीही महिला पोलिस अधिकारी प्रतीक्षा लाकडे मंदिरात गाऊन घालून गेल्या. त्यावेळी आशा गायकवाड या स्थानिक महिलेने जाब विचारल्यामुळे संतापलेल्या लाकडे यांनी गायकवाड यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेत आशा गायकवाड जखमी झाल्या आहेत.
वास्तविक हा मंदिरात गाऊन घातलेल्या महिलांना प्रवेश न देणं हा प्रकार चुकीचाच असला, तरी महिला पोलीस अधिकारी लाकडे यांना त्याबाबत तक्रार करता आली असती, मात्र त्यांनी केलेल्या मारहाणीमुळे कल्याण पूर्व भागात पोलिसांबद्दल संताप व्यक्त होत आहे. या सगळ्या प्रकाराबाबत पोलिसांनी परस्परविरोधी एनसी दाखल करुन घेतल्याने पोलीस लाकडे यांना पाठीशी घालत असल्याचाही आरोप स्थानिकांचा आहे.