रायगड : उद्धव ठाकरे आणि संजय राऊत भेटायला आले होते. मात्र ते सत्तेत समाधानी असल्याचं जाणवत नाही, असे शरद पवार म्हणाले. शिवाय, उद्या कुणी सत्तेतून पाठिंबा काढला, तरी कुणालाही मदत करण्याची आमची भूमिका नाही, असे शरद पवारांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात दहा दिवसांपूर्वी भेट झाल्याचे आता दस्तुरखुद्द शरद पवारांनीच पत्रकार परिषदेत मान्य केले आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत या दोघांसोबत माझी भेट झाली. मात्र राजकीय समीकरणांबाबत उद्धव ठाकरे काहीही बोलले नाहीत असे शरद पवार यांनी म्हटले आहे. शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढला तर राष्ट्रवादी पाठिंबा देणार नाही, बाहेरूनही पाठिंबा देणार नाही, असेही शरद पवारांनी म्हटले आहे. मात्र सरकारचा पाठिंबा आम्ही काढू असे उद्धव ठाकरे बोललेले नाहीत, हेदेखील त्यांनी स्पष्ट केले.
कर्जतमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी ही महत्त्वाची माहिती दिली. शिवसेना सरकारमध्ये समाधानी असल्याचे वाटत नाही असेही मत त्यांनी व्यक्त केले. आम्ही समविचारी पक्षासोबत राहू असे सांगत शरद पवारांनी गुगली टाकला आहे. शिवसेनेला सोबत घेणार नाही असेच एकप्रकारे शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट १० दिवसांपूर्वी झाल्याचे वृत्त आज सकाळपासूनच सुरु आहे. ही बातमी येताच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असे समीकरण महाराष्ट्रात बघायला मिळेल का याची चर्चा चांगलीच रंगली. मात्र असे काहीही होणार नसल्याचे खुद्द शरद पवारांनीच म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी नेमकी काय चर्चा झाली हे त्यांनी सांगितलेले नाही. मात्र या बातमीमुळे दिवसभर राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या होत्या.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप हा राज्यात क्रमांक १ चा पक्ष ठरला. मात्र भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. निकालाच्याच दिवशी सरकार पाच वर्षे चालावे म्हणून राष्ट्रवादीने भाजपला बाहेरुन पाठिंबा जाहीर करत शिवसेनेची कोंडी केली होती. या निर्णयामागे शरद पवारच होते हे महाराष्ट्र जाणतो. शिवसेना भाजप यांची युती नंतर झाली. मात्र मागील तीन वर्षात शिवसेना आणि भाजप यांच्यातून विस्तव जात नाहीये हेच वारंवार दिसते आहे. कारण भाजप आणि शिवसेना यांच्यात कायम वादच होताना दिसत आहेत.
या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र भाजपला पाठिंबा देणार नाही आणि समविचारी पक्षांसोबतच चर्चा करू असे सांगत शरद पवारांनी गुगली टाकला आहे. शरद पवारांचे हे वक्तव्य म्हणजे येत्या काळातील नव्या राजकीय समीकरणांची नांदी तर नाही ना? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.