गुजरात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पाटीदार समाजाचा नेता हार्दीक पटेल ची कथित व्हीडीओ सीडी सोशल मिडियावरुन व्हायरल करण्यात आली. या प्रकारावरुन गुजरातमध्ये पटेल याच्या विरोधकाकडून राजकारण तापवण्यात आले. सीडी खरी की खोटी हा भाग वेगळा परंतु राजकारणात पातळी किती खालच्या स्तरावर गेली याचा पुन्हा प्रत्यय आला. खरतर गुजरातमध्ये सध्या राजकारण तापलेले असतांना असा प्रकार करणे हे दुर्देवच म्हणावे लागेल. अनेक नेत्यांच्या सीडीच व्हायरल झालेल्या आहेत. पटेल बद्दल काही नवीन नाही. पटेल यांनी या सर्व प्रकरणावरुन स्पष्टीकरण दिलेले आहे. राजकीय,सामाजिक आयुष्यात राजकीय मंडळी आरोप प्रत्यारोप करत असतात. यामधून देशातील,विदेशातील मोठ्या पदावर काम करणारेही नेते सुटले नाहीत. राजकारणात कधी कुणी आपल्याला जडणार किंवा आपल्याला या व्यक्तीपासून धोका आहे अशा वेळी एकतर त्याच्यावर आरोप लावून बदनाम केले जाते किंवा त्याची हत्या केली जाते. गुजरातमध्ये हार्दीक पटेल हा तरुण त्याच्या विरोधकांना त्रासदायक ठरत असल्यामुळे कथित सीडी व्हायरल करण्यात आली असाही प्रकार तो असू शकतो. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार अहमद पटेल ज्या रुग्णालयाचे अध्यक्ष होते त्या रुग्णालयातील एक कर्मचारी हा आतंकवादी कारवाया मध्ये सहभागी होता असा आरोप करुन त्याला अटक करण्यात आली होती. अहमद पटेल व काँग्रेसवर गंभीर आरोप करण्यात आले होते. यावरुन माध्यमांमध्ये बरीच चर्चा चालली. परंतु पटेल यांनी मी रुग्णालयाच्या पदावरुन राजीनामा दिलेला आहे. रुग्णालयाशी माझा काहीही संबंध नाही असे पत्रक काढले.राजीनामा पत्रकही प्रसारमाध्यमांना दिले. दुसरे त्यांनी या प्रकरणाची चौकशीही मागणी गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली. सत्य काय आहे ते समोर आले पाहिजे अशी मागणी केली. यामुळे पटेल यांच्या विरोधकांची बोलती बंद झाली. आता हार्दीक पटेलचे प्रकरण समोर आले. मतदानापूर्वी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्याचे काम गुजरातमध्ये जोरात सुरु असून दुध का दुध पाणी का पाणी होईलच. जनता एवढी दुधखुळी नाही. परंतु ही वेळ का आली. राजकारण खरच एवढ्या खालच्या स्तरावर गेले आहे का? याचा विचार करण्याची गरज आहे.