सतत काम करत असल्यामुळे बऱ्याचशा कलावंतांना सुट्टी घेणं मुश्किल होऊन बसते. मिळालीच तर एखादी छोटीशी ट्रिप पण कशीबशी करता येते. गेल्या अनेक महिन्यांपासून सोनाली कुलकर्णी सतत काम करतेय. त्यामुळे कुटुंबासोबत तसा वेळ घालवायला वेळ मिळताना मुश्किल होते.
दिवाळीच्या सुमारास वेळातवेळ काढून सोनालीने कुटुंबासमवेत बाहेरगावी जाण्याचा बेत आखला. नवरा, ती आणि त्यांची मुलगी कावेरी पोहोचले जीवाचं हॉंगकॉंग करायला. तेथील ‘डिस्नेलॅन्ड’ मध्ये कावेरीने आई-वडिलांसोबत खूप धमाल केली. सर्वत्र आनंदीआनंद असताना अचानक सोनालीला ट्रिप अर्धवट सोडून मुंबईला परतावं लागलं. नाही, कुठे किंवा कुणाचं काही बरंवाईट झालेलं नाही.
‘स्वरतरंग’ हा मुंबई पोलीस खात्याचा वार्षिक रंगारंग कार्यक्रम आणि ज्यात हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतले बरेच कलाकार सहभागी होतात आणि मुंबई पोलीस खात्याचे निमंत्रण येणे हे खूप मानाचे समजले जाते. या वर्षी सोनालीला त्यांचा दूरध्वनी आला आणि कार्यक्रमात सहभागी होण्याची विनंती करण्यात आली. सोनालीने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत लगेच होकार कळवला आणि हॉंगकॉंग मधील कुटुंब-सहल अर्धवट सोडून तडक मुंबई गाठली.