सालस आणि घरंदाज भूमिकांना रुपेरी पडद्यावर जिवंत करणारी अभिनेत्री रेणुका शहाणे पुन्हा एकदा नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तनुसार रेणुका ‘खिचडी’ या लोकप्रिय मालिकेच्या नव्या पर्वात दिसणार आहेत. बऱ्याच काळानंतर रेणुका पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतणार असल्यामुळे चाहत्यांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
तब्बल दहा वर्षांनंतर ‘खिचडी’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत रेणुका पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसेल. तिची भूमिका छोटेखानी असली तरी महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे आता विनोदाची ही ‘खिचडी’ प्रेक्षकांची दाद मिळवते का, हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे.
‘खिचडी’ या मालिकेच्या नव्या पर्वातून निर्माता-अभिनेता जमनादास मजीठिया आणि लेखक- अभिनेता आतिश कपाडिया यांची मुलंसुद्धा टेलिव्हिजन विश्वात पदार्पण करणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या मालिकेच्या तिसऱ्या पर्वाची घोषणा करण्यात आली. २००२ मध्ये ‘खिचडी’च्या पहिल्या पर्वाला सुरुवात झाली होती. एका गुजराती कुटुंबातील व्यक्तींचे स्वभाव, त्यातून उडणारे खटके आणि त्यांचे विनोद अशा हलक्याफुलक्या कथानकाला या मालिकेतून न्याय देण्यात आला होता. त्यानंतर २००५ मध्ये ‘इन्स्टंट खिचडी’ या नावाने मालिकेच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली. सलग दोन्ही पर्वांना मिळालेले यश पाहता आता हे हटके कुटुंब पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहे.