अभिनेत्री राणी मुखर्जीचे वडील राम मुखर्जी यांचं निधन झालं आहे. आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. दुपारी २ वाजता विले पार्लेस्थित पवन हंस स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. काही दिवसांपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी पार्टीमध्येही त्यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांच्या आकस्मित निधनामुळे मुखर्जी कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
चित्रपटसृष्टीमध्ये दिग्दर्शन, पटकथा लेखन आणि निर्मिती क्षेत्रात मुखर्जी यांनी आपली छाप सोडली होती. ‘हम हिंदुस्तानी’, ‘लीडर’ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. त्यांना कलेचा वारसा कुटुंबातूनच मिळाला होता. चित्रपट निर्माते शशाधर मुखर्जी हे राम मुखर्जी यांचे काका होते. ‘फिल्मालय स्टुडिओज’शी राम मुखर्जी यांचं अगदी जवळचं नातं होतं. त्यांची पत्नी उत्तम गायिका असून मुलगी राणी मुखर्जी अभिनय क्षेत्रात चांगलीच नावारुपास आली आहे. चित्रपटसृष्टीत राणीने वडिलांचा वारसा पुढे नेत आपल्या कुटुंबाच्या नावाची परंपरा सुरु ठेवली आहे.