औरंगाबाद।‘दशक्रिया’ सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी आणण्याची विनंती करणारी याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. न्या. संभाजी शिंदे व न्या. मंगेश पाटील यांच्या खंडपीठानं हा निकाल दिला. पैठण येथील पुरोहित समीर शुक्ल, सोहम पोहेकर, समीर धर्माधिकारी तसेच संतोष छडीदार, गोवर्धन छडीदार यांनी ही याचिका दाखल केली होती. चित्रपटातील अनेक संवाद भावना दुखावणारे तसेच संदर्भहीन असल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केला होता. गुरुवारी सिनेमांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयालयाने दिलेल्या निर्णयाचा आधार घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आज ‘दशक्रिया’ सिनेमाच्या विरोधातील याचिका फेटाळून लावली. त्यामुळे हा चित्रपट सर्व थिएटर्समध्ये झळकेल.
चित्रपटातील आक्षेपार्ह संवाद, दृश्ये वगळण्यात यावीत आणि या चित्रपटाच्या प्रदर्शनास बंदी घालावी, अशी मागणी त्यांनी केली. ज्येष्ठ लेखक बाबा भांड यांच्या ’दशक्रिया’ या कादंबरीकर आधारित या चित्रपटाचं दिग्दर्शन संदीप पाटील यांनी केले आहे. मात्र मूळ कादंबरीत नसलेल्या गोष्टी चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत, असं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी म्हटलं आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने या चित्रपटाला विरोध केला आहे.