बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटाची अर्थात ‘सूर्यवंशी’ची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. हा चित्रपट गेल्या वर्षी 24 मार्च रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु, लॉकडाऊनमुळे याचे प्रदर्शन पुढे ढकलले गेले होते. त्यानंतर, काही दिवसांपूर्वी ‘सूर्यवंशी’ चित्रपट 2 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार, असे म्हटले जात होते.
आता चित्रपटाच्या रिलीजची तारीख अक्षय कुमारने चाहत्यांसोबत शेअर केली आहे. रोहित शेट्टीच्या वाढदिवसाला हा चित्रपट रिलीज होणार असून हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होईल.अक्षय कुमार आणि कतरिना कैफचा सूर्यवंशी हा चित्रपट 30 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. अक्षय कुमारने स्वत: ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे..
अक्षय कुमारने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “आम्ही सर्वांनी तुम्हाला चित्रपटाच्या दमदार एक्सपीरियंसचा वादा केला होता” आता शेवटी प्रतीक्षा संपेल… पोलिस येत आहेत. सूर्यवंशी 30 एप्रिल 2021 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. #Sooryavanshi30thApril असे अक्षयने लिहिले आहे. यामुळे आता अक्षयच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
सिंबा चित्रपटानंतर अक्षयने सूर्यवंशी या चित्रपटाची घोषणा केली होती. सिंबा चित्रपटातही अक्षय कुमारने काम केलं आहे. सिंबा चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसादही मिळाला होता. चित्रपटाने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले होते. सिंबा हा 2018 मधील ब्लॉकबस्टर चित्रपट म्हणून ठरला होता.
चित्रपटात रणवीर सिंह आणि सारा अली खान मुख्य भूमिकेत होते. रोहित शेट्टी यांनी सिंबा चित्रपटाशिवाय दिलवाले, सिंघम, चेन्नई एक्स्प्रेस, गोलमाल सीरीज, बोल बच्चन आणि ऑल द बेस्ट सारखे चित्रपट बॉलिवूडमध्ये दिले आहेत. आतापर्यंत रोहित शेट्टी यांचे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर हीट ठरले आहेत.