मुंबई: पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना केंद्रीय तपास यंत्रणेने अटक केल्यानंतर त्यांना 25 मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. सत्र न्यायालयानं ही कोठडी ठोठावली आहे. शनिवारी (13 मार्च) रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी NIAनं सचिन वाझे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. त्यापूर्वी जवळपास 12 तास त्यांची NIA ने चौकशी केली.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ गाडीत जिलेटीन स्फोटकाच्या कांड्या Gelatin Sticks आढळल्या होत्या. या प्रकरणात सचिन वाझे यांना अटक करण्यात आली.
या प्रकरणात सहभाग असल्याच्या संशयावरून सचिन वाझे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. भारतीय दंड विधानाच्या 286, 465, 473, 506 (2), 120 ब आणि 4 (अ) (ब) (इ) तसेच स्फोटक पदार्थ अधिनियम 1908 अन्वये सचिन वाझे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्यावसायिक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात राज्य दहशतवादविरोधी पथक अटक करू शकेल, अशी शक्यता असल्याने वाझे यांनी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. या अर्जावर निकाल होईपर्यंत अटक करू नये, अशी मागणी त्यात होती.
हेही वाचा:वाझेंना अटक झाल्यानंतर संजय राऊतांचं ट्विट; म्हणाले…
मात्र हे प्रकरण गंभीर असून वाझे यांना अटक करून कोठडीतील चौकशी आवश्यक आहे, असा युक्तिवाद करत एटीएसने या अर्जास विरोध केला होता. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून तपास यंत्रणेकडे वाझे यांच्याविरोधात प्राथमिक पुरावे असल्याने त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज देता येणार नाही, असं सांगत याचिका फेटाळून लावली. त्यानंतर वाझेंचा एनआयएने जबाब नोंदवला होता. जिलेटीन च्या कांड्या असलेली स्कॉर्पिओ गाडी 25 फेब्रुवारी रोजी पोलिसांना उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर आढळली होती.