आज जागतिक महिला दिन साजरा केला जातोय. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरुन त्यांच्या चाहत्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर अनेकांनी त्यांच्या आयुष्यात खास असलेल्या स्त्रीचे आभार मानले आहेत. यात अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या पोस्टने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर रिया चर्चेत आली होती. त्याच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणी तिला अंमली पदार्थ विभागानं ताब्यातही घेतलं होतं. एक महिन्यानंतर तिची जामिनावर मुक्तता करण्यात आली. तेव्हापासून रिया चक्रवर्ती सोशल मीडियापासून दुरावली आहे. मात्र आज महिला दिनानिमित्ताने रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमुळे रिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केलाय. या फोटोत तिने एक हात तिच्या हातात घट्ट पकडल्याचं दिसतं आहे. रियाने आईचा हात पकडल्याचा फोटो शेअर केला आहे. “आम्हाला महिला दिनाच्या शभेच्छा.. आई आणि मी.. कायम एकत्र..माझी ताकद, माझा विश्वास,माझं मनोबलं – माझी आई” असं कॅप्शन रियाने या फोटोला दिलंय.
सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर रिया चक्रवर्तीने सोशल मीडियाकडे पाठ वळवली होती.
ऑगस्ट 2020 मध्ये रियाने शेवटची सोशल मीडिया पोस्ट केली होती. त्यानंतर जवळपास 6 महिन्यांनी तिने पुन्हा जागतिक महिला दिनाचं निमित्त साधत इन्स्टाग्राम पोस्ट केलीय.
दरम्यान, सुशांत सिंह ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने न्यायालयासमोर ३० हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलंय. 30 हजार पानांच्या या आरोप पत्रांमध्ये रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावासह ३३ जणांची नावं आहेत. या प्रकरणाचा तपास करत असताना एनसीबी काही ड्रग्ज पेडलर्स आणि इतरांनाही अटक केली होती. त्यांचीही नावं यात आहेत. एनसीबीने २०० जणांचे जबाब नोंदवले असून, १२ हजार पाने आणि ५० हजार पाने डिजिटल स्वरूपात हे आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आलं आहे.