मराठी चित्रपट केवळ आशय आणि मांडणीच्या जोरावर सीमा ओलांडतोय असं नाही, तर त्याला नवे भौगोलिक परिमाणही लाभते आहे. प्रयोगशील दिग्दर्शक समीर आशा पाटील दिग्दर्शित आणि अँफरॉन एंटरटेन्मेंट निर्मित आगामी चित्रपट “फुर्रर” हा चित्रपट त्याचे उत्तम उदाहरण ठरणार आहे. हा चित्रपट पाच राज्यांमध्ये ३० दिवसांत चित्रीत केला जाणार आहे. त्यामुळे या चित्रपटात नक्कीच काहीतरी वेगळे पाहायला मिळणार आहे.
“फुर्रर” या चित्रपटाचा नुकताच मुहूर्त करण्यात आला असून गुजरातमधील सापुरताजवळील डांग गावात सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले आहे. समीर आशा पाटील यांनी त्याच्या “चौर्य” या चित्रपटातही भौगौलिक सीमा ओलांडत चंबळमध्ये चित्रीकरण केले होते. आता “फुर्रर” या चित्रपटाच्या निमित्ताने त्याच्या पुढे जात पाच राज्यांमध्ये चित्रीकरण केले जाणार आहे. महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, दिल्ली आणि उत्तराखंडमध्ये हे चित्रीकरण होणार आहे. तीस दिवसांमध्ये हे चित्रीकरण करण्याचे नियोजन आहे.
दिग्दर्शक समीर आशा पाटील यांनी या चित्रपटा विषयी माहिती देताना सांगितले, ‘या चित्रपटाचे कथानक प्रवासाबद्दल आहे. प्रत्यक्ष प्रवासासह त्यात मानसिक आणि भावनिक प्रवासही आहे. त्यामुळे आम्हाला वेगवेगळ्या लोकेशनवर चित्रीकरण करण्याची गरज होती. हा तसा मोठा प्रवास आहे. त्यामुळे पाच राज्यांमध्ये आम्ही चित्रीकरण करणार आहोत. निर्माते कुशल आणि अनिरुद्ध सिंग यांनी माझ्या कथानकावर विश्वास ठेवत पूर्ण पाठिंबा दिल्यामुळेच हा प्रवास शक्य होत आहे. कारण या चित्रपटाचा पट मोठा आहे. मात्र, निर्मात्यांनी काहीही तडजोड न करता चित्रपटाच्या मांडणीवर भर दिला आहे. त्यामुळे मराठी चित्रपटात या पूर्वी न दिसलेला परिसर प्रेक्षकांना पाहायला मिळेल,’ असे समीर आशा पाटील यांनी सांगितले. फुर्रर या चित्रपटात अभिनेते सयाजी शिंदे हे प्रमुख भूमिका साकारणार असून अन्य कलाकारांची नावे ही अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. या चित्रपटात कोण कोण कलाकार असणार यासाठी प्रेक्षकांना काही दिवस तरी वाट पाहावी लागणार आहे.