Sunday, September 15, 2024
Homeदेशभाजपचा 'पप्पू' निवडणूक आयोगाच्या परीक्षेत नापास

भाजपचा ‘पप्पू’ निवडणूक आयोगाच्या परीक्षेत नापास

महत्वाचे…
१.पप्पू’ हा शब्द एका विशिष्ट व्यक्तीसाठी अपमानजनक आहे २.जाहिरातीत पप्पू नावाचं पात्र दाखवण्यात आलं ३. आयोगाच्या या पवित्र्यामुळं भाजपची गोची


अहमदाबाद: गुजरातची सत्ता राखण्यासाठी जंगजंग पछाडणाऱ्या भाजपला निवडणूक आयोगानं जोरदार झटका दिला आहे. पप्पूशब्दाचा वापर असलेली भाजपची एक व्हिडिओ जाहिरात निवडणूक आयोगानं रोखून धरली आहे. हा शब्द एका विशिष्ट व्यक्तीचा उपहास व अपमान करणारा आहे, असं आयोगानं म्हटलं आहे.

‘टाइम्स नाउ’ वृत्तवाहिनीनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. भाजपच्या गुजरात शाखेनं ३१ ऑक्टोबर रोजी एक जाहिरात मान्यतेसाठी आयोगाकडं पाठवली होती. या जाहिरातीत पप्पू नावाचं पात्र दाखवण्यात आलं आहे. काही कामानिमित्त हा पप्पू दुकानात जातो. दुकानात काम करणारा माणूस त्याला पाहून ‘सर, पप्पू आला आहे,’ असं त्याच्या मालकाला सांगतो. हा ‘पप्पू’ मुका असून विकास म्हणजे काय हे त्याला कळत नसल्याचं यात दाखवण्यात आलंय. अर्थात, पप्पूचा चेहरा जाहिरातीत दाखवण्यात आलेला नाही. असं असलं तरी मुख्य निवडणूक आयुक्तांनी त्यास आक्षेप घेतला आहे.
देशभरात हजारो लोकांना ‘पप्पू’ या नावानं संबोधलं जातं. मात्र, राजकारणात हा शब्द भाजपकडून राहुल गांधी यांच्यासाठी वापरला जातो हे उघड आहे. निवडणूक आयोगानं नेमकं त्यावरच बोट ठेवलं आहे. ‘पप्पू’ हा शब्द एका विशिष्ट व्यक्तीसाठी अपमानजनक आहे. हा शब्द उच्चारताच तो कोणासाठी उच्चारण्यात आला आहे, याचा बोध सर्वसामान्यांना सहज होतो, असं आयोगानं म्हटलं आहे. आयोगाच्या या पवित्र्यामुळं भाजपची गोची झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त बी. बी. स्वेन यांनी याबाबत अधिक बोलण्यास नकार दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments