मुंबई – विश्वसुंदरी आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिचा आज वाढदिवस असून, तिने वयाची ४४ वर्षे पूर्ण केली आहेत. १ नोव्हेंबर १९७३ साली मंगलोर, कर्नाटकमध्ये ऐश्वर्याचा जन्म झाला होता. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन याच्यासोबत ऐश्वर्याने २००७ साली विवाह केला आणि आता त्यांना आराध्या ही ५ वर्षांची मुलगी देखील आहे. अभिषेक बच्चन आणि लेक आराध्या यांनी ऐश्वर्यासाठी खास बर्थडे सरप्राइज प्लान केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऐश्वर्याच्या बर्थडेला कोणत्याही मोठ्या पार्टीचे आयोजन केले जाणार नाही. पण, अभिषेक आणि आराध्याने काही स्पेशल प्लानिंग केले आहे. कारण, गेल्या वर्षी मार्च महिन्यात ऐश्वर्याच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे ते ऐश्वर्याचा बर्थडे अगदी साध्या पद्धतीने साजरा करणार आहेत. अभिषेक आणि आराध्याने ऐश्वर्याचा आवडता केक ऑर्डर केला आहे. सायंकाळी आपल्या सगळ्या कुटुंबियांसोबत मिळून ऐश्वर्या आपला वाढदिवस साजरा करेल. अभिषेकने आपल्या पत्नीसाठी खास डिनर प्लान केल्याचे देखील सुत्रांकडून समजते. येत्या १६ नोव्हेंबर रोजी आराध्या देखील ६ वर्षांची होणार आहे.
ऐश्वर्याच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर बॉलिवूड सेलेब्ससह चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
ऐश्वर्या राय बच्चनने १९९४ साली मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावे केला होता. मॉडलिंगने आपल्या करियरला सुरुवात करणाऱ्या ऐश्वर्याने हिंदीसह विविध भाषांच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ऐश्वर्याने पती अभिषेकसोबत ‘ढाई अक्षर प्रेम के’ (२०००), ‘कुछ ना कहो’ (२००३), ‘बंटी और बबली’ (२००५), ‘उमराव जान'(२००५), ‘धूम-२'(२००६), और ‘गुरु'(२००७) अशा एकूण ६ चित्रपटांमध्ये काम केले आहे.