Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमनोरंजन‘पद्मावत’ला तब्बल ३०० कट!

‘पद्मावत’ला तब्बल ३०० कट!

संजय लीला भन्साळी आणि त्यांची संपूर्ण टीम आता पुन्हा एकदा ‘पद्मावत’च्या संकलनावर लक्ष केंद्रित करत आहे. करणी सेना आणि इतर काही संघटनांकडून होणारा निषेध, भन्साळी आणि दीपिकाला आलेल्या जीवे मारण्याच्या धमक्या आणि एकंदर बिघलेली परिस्थिती पाहता ‘पद्मावती’ चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यात आले. अखेर, सेन्सॉरने यावर तोडगा काढत पाच बदल करण्यास सांगत चित्रपटाचे शीर्षक ‘पद्मावत’ करण्याचा निर्णय दिला. मात्र प्रत्यक्षात ‘पद्मावत’मधील पाच बदल नसून तब्बल ३००हून अधिक बदल करण्यात आले आहेत.

‘पद्मावत’ चित्रपटातील मेवाड, दिल्ली, चित्तौडगढ या शब्दांचा उल्लेख काढण्यात येणार आहे. तसेच, हा पूर्णपणे काल्पनिक चित्रपट असेल. सेन्सॉरच्या या निर्णयामुळे प्रेक्षकांना अलाउद्दीन खिल्जी नक्की कुठून आला आणि त्याने कुठे लढाई केली याचा काहीच संदर्भ लागणार नाही. या सगळ्यात भन्साळी यांची संपूर्ण टीम मात्र पुन्हा चित्रपटाचे संकलन करण्यात एकवटली आहे. ‘पद्मावत’ची तुलना आता अभिषेक चौबेच्या ‘उडता पंजाब’ चित्रपटाशी होत आहे. कारण, त्यावेळी सेन्सॉरचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी चित्रपटातील पंजाब, जलंधर, चंदीगढ, अमृतसर, तरनतारन, जश्नपुरा, अंबेसर, लुधियान आणि मोगा हे शब्द काढण्यास सांगितले होते. यामुळे पहलाज यांच्यावर बरीच टीका करण्यात आली होती. मात्र, आता पहलाज आणि सध्याचे सेन्सॉरचे अध्यक्ष प्रसून जोशी यांच्यात काहीच फरक नाही असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. प्रसून यांनीही पहलाज यांच्या पावलावर पाऊल ठेवत चित्रपटावर प्रमाणाच्या बाहेर कात्री चालवत ३०० कट्सचा निर्णय दिला आहे. दरम्यान, ‘पदमावती’ चित्रपटाचे नाव ‘पद्मावत’ ठेवण्यात आले असले तरी राजस्थान सरकारने या चित्रपटाच्या प्रदर्शनावरील बंदी मात्र कायम ठेवली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments