Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रकोंकणजगप्रसिद्ध वारली चित्रकार, पद्मश्री जीव्या म्हशे यांचे निधन

जगप्रसिद्ध वारली चित्रकार, पद्मश्री जीव्या म्हशे यांचे निधन

पालघर: जगप्रसिद्ध वारली चित्रकार पद्मश्री जीव्या सोमा म्हशे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते ८३ वर्षांचे होते. दरम्यान अनेक राजकीय व्यक्तींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ठाणे जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील धामणगाव हे त्यांचे जन्मगाव. आदिवासी पाड्यांवरील वारली चित्रची कला त्यांनी सातासमुदापार नेली. डहाणू तालुक्यात गंजाड गावातल्या कलमी या आदिवासी पाड्यात १३ मार्च, १९३१ ला जिव्या सोमा म्हशे यांचा जन्म झाला. वारली चित्रे फक्त सुवासिनींनीच काढायची ही आदिवासींची प्रथा होती.

मात्र वयाच्या तेराव्या वर्षी म्हशे यांनी ही प्रथा मोडली. त्यानंतर अव्याहतपणे ६६ वर्ष ते ही कला जोपासत राहिले. त्यांच्या कलात्मक वस्तूंना बाजारपेठ मिळावी यासाठी १९७५ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशभरात एक शोध मोहीम राबविली होती. त्या मोहिमेतील भास्कर कुलकर्णी यांना जिव्या सोमा म्हशे हा अस्सल हिरा सापडला आणि म्हशे यांच्यासह वारली चित्र संस्कृतीचेही नशीब पालटले.

रशिया, इटली, जर्मनी, जपान, चीन, इंग्लंड, बेल्जियम अशा अनेक देशांनी म्हशे यांना आपली कलाकुसर दाखविण्यासाठी निमंत्रित केले. केंद्र सरकारने देखील म्हशे यांना २०११ ला पद्मश्री पुरस्काराने गौरवले.

दरम्यान, पद्मश्री जिव्या सोमा म्हशे यांच्या निधनामुळे वारली चित्रकलेचे पितामह काळाच्या पडद्याआड गेले आहेत. वारलीला त्यांनी जगभरात पोहोचवले. या कलेला नवी उंची दिली. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी देखील त्यांच्या अद्भूत कलेच्या चाहत्या होत्या. जिव्या सोमा म्हशे यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली!, असे ट्विट काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले आहे.

तर चित्रकला जगभरात पोहोचविणारे ख्यातनाम कलाकार पद्मश्री जीवा सोमा म्हशे यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. ग्रामीण भागातील वारली या आदिवासी कलेला वैभव प्राप्त करुन देण्यात डहाणूच्या या चित्रकाराचे मोठे योगदान होते. पद्मश्री जीवा यांना अनेक पुरस्कारांनी सुद्धा गौरविण्यात आले होते. वारली कलेच्या जगभरात प्रसारासाठी त्यांचे कुटुंबीय आज सुद्धा मोठे योगदान देत आहेत. मी पद्मश्री जीवा सोमा म्हशे यांच्या स्मृतीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे, असे ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments