Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रपंकजा मुंडे भाजप सोडणार? १२ डिसेंबर रोजी फैसला

पंकजा मुंडे भाजप सोडणार? १२ डिसेंबर रोजी फैसला

मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी एक फेसबुक पोस्ट केली. पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं?, यासंबंधी मी १२ डिसेंबर रोजी सांगणार आहे, असे पंकजा मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. पंकजा मुंडे भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

परळी मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या पंकजा मुंडे यांचा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पराभव केला. पकंजा यांना पराभवाचा धक्का बसल्याने आता पुढची रणनीती काय?, यासंबंधी त्या १२ डिसेंबर म्हणजेच वडील दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिनी ठरवणार असल्याचे त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून सांगितले आहे. आज सकाळी पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे.

काय आहे फेसबुक पोस्ट मध्ये….

नमस्कार,

मी पंकजा गोपीनाथ मुंडे… निवडणुका झाल्या निवडणुकीचे निकाल ही लागले. निकालानंतर राजकीय घडामोडी, कोअर कमिटीच्या बैठका, पक्षाच्या बैठका, हे सर्व आपण सर्वजण पहात होता. पराभव झाल्यानंतर काही क्षणातच माध्यमांसमोर जाऊन मी तो स्वीकारला. आणि विनंती केली की कुणीही याची जबाबदारी कुणावरही टाकू नये. सर्व जवाबदारी माझी आहे.

दुसऱ्याच दिवशी पार्टीच्या कोअर कमिटीच्या बैठकीस मी हजरही झाले. ‘आधी देश,नंतर पार्टी आणि शेवटी स्वत:’ हे संस्कार आमच्यावर लहानपणापासून झालेले आहेत. जनतेप्रती आपल्या कर्तव्यापेक्षा मोठं काहीही नसतं असं मुंडेसाहेबांनी लहानपणापासून शिकवलेलं आहे. त्यांच्या शिकवणी नुसार त्यांच्या मृत्युनंतर अगदी तिसऱ्याच दिवशी मी कामाला लागले. पाच वर्षे सत्तेच्या माध्यमातून तुमची सेवा केली. मला ही सेवेची संधी केवळ आणि केवळ तुमच्या विश्वासामुळे मिळाली आणि आज पराभवानंतर माझ्याहीपेक्षा व्यथित माझ्या लोकांनी मला इतके मेसेजेस केले, इतके फोन केले, इतके निरोप दिले. “ताई आम्हाला भेटायला वेळ द्या,” ..”ताई आम्हाला तुम्हाला बघून तरी जाऊ द्या “…किती संवेदना तुम्ही माझ्यासाठी व्यक्त केली .

मी तुम्हा सर्वांची खुप खुप आभारी आहे. मला याची पुर्ण जाणीव आहे की तुमचं प्रेम हे माझ्यावर आहे आणि तेच माझं कवचकुंडल आहे. मुंडेसाहेबांनी एका क्षणात मला राजकारणात आणलं. एका क्षणात ते आपल्यातून निघूनही गेले. पहील्यांदा मुंडेसाहेबांचा आदेश म्हणून मी राजकारणात आले आणि नंतर मुंडेसाहेबांच्या पश्चात जनते प्रती असलेल्या जवाबदारी म्हणुन राजकारणात राहीले. आज राजकारणामध्ये झालेले बदल, जबाबदारीत झालेले बदल या सगळ्या बदलत्या संदर्भांचा विचार करुन आपला सर्वांचा पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्यकता आहे.

आपण मला वेळ मागत आहात.. मी आपल्याला वेळ देणार आहे… आठ ते दहा दिवसांनंतर…हे आठ-दहा दिवस मला थोडासा स्वत:शी संवाद साधण्यासाठी वेळ हवाय. पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करुनच मी १२ डिसेंबर रोजी आपल्या समोर येणार आहे, असे पंकजा मुंडे यांनी फेसबुकमध्ये म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments