वर्धा : वर्ध्यात सेल्फी काढण्याचा नाद दोघांच्या जीवावर बेतला आहे. बोर धरणावर फिरण्यासाठी आलेल्या दोघा मित्रांचा सेल्फी काढताना पाण्यात बुडून मृत्यू झाला. पंकज गायकवाड आणि निखिल काळबांडे अशी मयत तरुणांची नावं आहेत.
नागपूरच्या शिवनगाव खापरी भागात राहणारे १२ मित्र फिरण्यासाठी वर्ध्यातील बोर धरणावर गेले होते. यावेळी पंकज पाण्यात पोहत होता, तर निखिल भिंतीवर उभा राहून फोटो काढत होता. फोटो काढताना पाय घसरुन तो बुडाला. मित्राला वाचवण्यासाठी पंकजही पोहत गेला. मित्राला वाचवण्याच्या प्रयत्नात पंकजही बुडाला आणि दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह पाण्याबाहेर काढले असून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नयेत, सेल्फी काढताना भलतं साहस करु नये, अशा सूचना पोलिस-प्रशासनातर्फे वारंवार दिल्या जातात. मात्र त्याकडे केलेलं दुर्लक्ष जीवावर बेतल्याचं अनेक वेळा समोर येत आहे.