जळगाव: जळगावात अनोखा महोत्सव साजरा केला जातो. हा महोत्सव आहे गोबर स्नानाचा. शेणानं माखून पारंपरिक गाणी म्हणत यात भाग घेतलेले लोक गोबरस्नानाचा आनंद लुटतात.
मड बाथ म्हणजे चिखलानं स्नान करण्याबद्दल तुम्ही ऐकलं असालंच. पण जळगावात एक वेगळाच स्नान महोत्सव भरतो आणि तो आहे चक्क गोबर स्नान महोत्सव. अगदी पायापासून डोक्यापर्यंत स्वत:ला या लोकांनी शेणानं माखून घेतलंय.
जळगावातल्या रतनलाल सी बाफना अहिंसा तीर्थगोशाळेत दर रविवारी गोबर स्नान महोत्सवाचं आयोजन होतं. गोसेवक आणि गोप्रेमी एकत्र येऊन देशी गायीचं गोमुत्र, शेण, तूप, दही, दूध आणि काळ्या मातीचं मिश्रण करतात आणि गोबरानं अभ्यंगस्नान करतात. भारतीय संस्कृतीमध्ये गायीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तिच्या शेण आणि मुत्रामध्ये औषधी गुणधर्म असल्याचंही सांगितलं जातं. गोबर स्नान आयोजित करण्यामागे हीच धारणा असल्याचं आयोजकांचं म्हणणं आहे.