नागपूर: कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने नागपूर शहरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. नागपूर शहरात १५ ते २१ मार्चपर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. नितीन राऊत यांनी यावेळी शहरातील परिस्थितीची माहिती दिली. तसंच नागरिकांना विनाकारण घराबाहेर फिरता येणार नाही असं सांगितलं.
“लॉकडाउनमध्ये कडक संचारबंदी ठेवण्याचे पोलिसांना निर्देश देण्यात आले आहे. याशिवाय लॉकडाउनच्या काळात खासगी कार्यालयं बंद राहणार असून शासकीय कार्यालयात २५ टक्के उपस्थितीला परवानगी असेल.
खासगी आणि शासकीय आर्थिक विषयक, लेखा व मार्च एंडिंग संबंधित कार्यालयं पूर्ण क्षमनेते सुरु राहतील. वैद्यकीय, पॅरामेडिकल आणि अत्यावश्यक सेवा सुरु राहतील,” असं नितीन राऊत यांनी यावेळी सांगितलं.
लॉकडाउनमध्ये मद्यविक्री दुकान बंद राहतील, मात्र त्यांची ऑनलाइन विक्री सुरु राहणार आहे. तसंच खाद्यपदार्थांची घरपोच सेवा सुरु राहील असं नितीन राऊत यांनी सांगितलं आहे. ओळखपत्र बाळगणं आवश्यक असेल असंही त्यांनी सांगितलं.
लसीकरण सुरु ठेवलं जाणार असून १३१ केंद्रावर अधिकाधिक लसीकरण करण्याची योजना असल्याची माहिती त्यांनी दिली. नितीन राऊत यांनी यावेळी लोकप्रतिनिधी तसंच स्वयंसेवी संस्थांना लसीकरणासाठी लोकांच्या प्रवासाची सोय करण्याचं आवाहन केलं.
“लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक सर्व सेवा सुरु राहणार आहेत. भाजीपाला, फळे, मांस, मासे, अंडी विकत घेण्यासाठी ही दुकानं सुरु राहतील. डोळ्यांचे दवाखानेही सुरु असतील,” असं नितीन राऊत यांनी सांगितलं.
“घरी विलगीकरणात असणाऱ्या रुग्णांनी पूर्णवेळ घरातच असावे यासाठी प्रशासनामार्फत अचानक भेट दिली जाईल. यावेळी कोणी दोषी आढळल्यास कारवाई केला जाईल,” असा इशारा नितीन राऊत यांनी दिला आहे. शहरात कोणीही विनाकारण फिरु नये सांगताना नितीन राऊत यांनी बंदी असल्याची माहिती दिली.