मुंबई: राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनचा इशारा दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी जेजे रुग्णालयात आज कोरोनाची लस घेतली. लस घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत उद्धव ठाकरेंनी लोकांना लसीबद्दल कोणतीही भीती किंवा संभ्रम न बाळगण्याचं आवाहन केलं. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी पुन्हा एकदा कडक लॉकडाउनचा इशारा दिला आहे. येत्या एक दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
“लसीकरणाबाबत कोणतीही भीती किंवा संभ्रम ठेवण्याची गरज नाही. लस घेताना अजिबात कळतही नाही, इतक्या सहज पद्धतीने ती दिली जात आहे. कोरोनाचा वाढत असल्याने लसीकरणासाठी पात्र ठरलेल्या सर्वांनी मनात कोणतीही शंका न बाळगता लस घ्यावी,” असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं.
पुढे बोलताना ते म्हणाले की, “कदाचित काही दिवसांमध्ये काही ठिकाणी लॉकडाउन करावा लागेल. त्यामुळे लसीकरण करुन घ्या, बाहेर अनावश्यक गर्दी टाळा, विनाकारण बाहेर येणं-जाणं टाळा, सार्वजनिक ठिकाणी मास्क लावा, हात धुवा, अंतर ठेवा”.
“कदाचित आपल्याला पुन्हा एकदा पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल. अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही, पण ती जाऊ नये असं वाटत असेल तर ही बंधन पाळणं गरजेचं आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज कोविड लसीचा पहिला डोस घेतला.
CM Uddhav Balasaheb Thackeray took his first shot of COVID vaccine today. pic.twitter.com/3JWlmvKpHL
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 11, 2021
औरंगाबादमध्ये निर्बंध असतानाही लोक बाहेर फिरत असल्याचं सांगण्यात आलं असता उद्धव ठाकरे म्हणाले की, “काही ठिकाणी कडक लॉकडाउन करावा लागेल. येत्या एक दोन दिवसांत आम्ही निर्णय घेणार आहोत. गरज वाटेल तिथे लॉकडाउन करावा लागेल”.