महत्वाचे…
१.एसटी नेमकी कुठे आहे आणि कधी पोहोचेल ते समजू शकणार २. अपघात झाल्यास तुलनेत तातडीने माहिती मिळू शकेल ३. आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक राज्यात ही प्रणाली आधीच बसवण्यात आलेली आहे.
मुंबई: एसटी बस स्थानकावर किंवा डेपोत लोकांना एसटीची वाट पाहावी लागते. अनेकदा एसटी येतही नाही रद्द होते. त्यामुळे प्रवाशांना भरपून हाल सहन करावे लागतात. पण हे हाल कमी करण्यासाठी आता व्हेकल ट्रॅकिंग सिस्टीम एसटीत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे बस कोणत्या ठिकाणी आहे आणि कधी पोहोचेल हे समजू शकेल.
या नव्या तंत्रज्ञानामुळं एसटी प्रवाशांना थोडा दिलासा मिळू शकतो. तसंच दिवाळ्यात निघालेल्या एसटीची परिस्थिती सुधारण्यास मदत होऊ शकते. एसटीने प्रवास करणारा प्रत्येक प्रवाशी तिची वाट पाहतो. असा एकही प्रवासी नाही ज्याने एसटीची वाट पाहिली नसेल. पण आता आपली एसटी नेमकी कुठे आहे आणि कधी पोहोचेल ते समजू शकणार आहे. महामंडळाच्या बैठकीत एसटीमध्ये व्ही टी एस म्हणजे व्हेनिकल ट्रॅकिंग सिस्टिम बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यामुळे वेळापत्रक सुधारेल. तसंच दुर्गम भागात एसटी नेमकी कुठे आहे ते समजू शकेल, अपघात झाल्यास तुलनेत तातडीने माहिती मिळू शकेल. महामंडळाच्या या निर्णयावर काही प्रश्न उपस्थित झालेत आणि अनेक अपेक्षाही व्यक्त केल्या गेल्यात. पण तरी आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक राज्यातल्या एसटी महामंडळांनी याआधीच अशी प्रणाली बसवली आहे.