मुंबई: राज्यातील भाजप सरकारविरोधात नाराजी व्यक्त करण्यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी शरद पवारांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीत उद्धव ठाकरेंनी भाजप सरकारविरोधात नाराजी व्यक्त केल्याचं बोललं जातंय. एवढंच उद्धव ठाकरेंची सरकारमध्ये राहण्याची मानसिकता नाही, असं मला दिसल्याचं पवारांनी म्हटल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी या दोन नेत्यांमध्ये ही भेट झाल्याचं बोललं जातंय.
भाजपने येत्या मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणेंना मंत्रिमंडळात सामील करून घेण्याची तयारी चालवलीय पण भाजपने खरंच असं केलं तर आम्ही सरकारच्या बाहेर पडू, अशा इशारा सरकारने यापूर्वीच दिला होता. तरीही भाजपकडून शिवसेनेलाही कोणतीच भीक घातली जात नाही. नारायण राणेंना मंत्री बनवण्यावर ठाम राहिला तर पुढे काय करायचं हा शिवसेनेसमोरचा प्रश्न आहे. याच अस्वस्थतेतून उद्धव ठाकरेंनी शरद पवारांची भेट घेतल्याचं बोललं जातंय. सेनेनं पाठिंबा काढला तर किमान राष्ट्रवादीने तरी भाजपला बाहेरून पाठिंबा देऊ नये, असाही या भेटीमागचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न असू शकतो.