Placeholder canvas
Tuesday, May 14, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई महापालिकेत शिवसेनेच्या दोन नगरसेवकांचा ‘ना’राजीनामा!

मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या दोन नगरसेवकांचा ‘ना’राजीनामा!

मुंबई – मुंबई महापालिकेत शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीने टोक गाठले आहे. याच गटबाजीतून दोन नगरसेवकांना पक्षाने राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. मंगेश सातमकर आणि आशिष चेंबूरकर या ज्येष्ठ नगरसेवकांना स्थायी समिती सदस्यत्व पदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याचे वृत्त एबीपी माझा वृत्तवाहिनीने दिले आहे. या प्रकारामुळे अंतर्गतवाद चव्हाट्यावर आला आहे.

मंगेश सातमकर हे सायन कोळीवाडयातून सलग तीन वेळा तर आशिष चेंबूरकर हे चार वेळा वरळीमधून निवडून आले आहेत. मागच्यावर्षी शिवसेनेने मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकल्यानंतर स्थायी समिती अध्यक्षपदासाठी सातमकर यांचे नाव चर्चेत होते. स्थायी समितीमध्ये वर्णी लागल्यानंतर मुंबई महापालिकेची आर्थिक नाडी हाती येते.

स्थायी समिती अध्यक्षपदासाठी मंगेश सातमकर यांचे नाव जवळपास निश्चितच झाले होते. मात्र ऐनवेळी ‘मातोश्री’वरून फोन खणखणला आणि डावलले गेलेले ज्येष्ठ नगरसेवक रमेश कोरगावकर यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली. त्यावेळी सातमकर नाराज होऊन महापालिकेतून निघून गेले होते. सातमकर आणि चेंबूरकर दोघेही महापालिकेतील कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असलेले नगरसेवक आहेत. सातमकर आणि चेंबूरकर यांच्या रिक्त झालेल्या जागेवर मनसेमधून शिवसेनेत आलेल्या नगरसेवकांना संधी मिळू शकते. मनसेतून शिवसेनेत आलेल्यांना पदावर प्राधान्य मिळत असल्याचे आधीच सेनेमध्ये नाराजी आहे. रविवारी  शिवसेनेतील नव्या नियुक्तीवरुन घाटकोपरमध्ये शिवसैनिकच आपापसात भिडले होते. याच परिसरात शिवसैनिकांनी पक्षाविरोधी पोस्टरबाजी केली होती. ‘राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेत घेण्यापेक्षा राज ठाकरेंनाच शिवसेनेत का घेत नाही? असा थेट सवाल नाराज शिवसैनिकांनी पोस्टरद्वारे विचारला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments