Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeविदर्भनागपूरहवालाकांडातील अडीच कोटी जप्त!

हवालाकांडातील अडीच कोटी जप्त!

महत्वाचे…
१. हवाला व्यावसायिकांमध्ये खळबळ उडवून देणा-या आणि राज्य पोलीस दलाला जबर हादरा
२. नागपूरच्या हवालाकांडात पोलिसांसोबत संगनमत करून लुटलेल्या २ कोटी, ५५ लाखांपैकी अडीच कोटींची रोकड जप्त
३. चंद्रपूर जिल्ह्यातील भीसी गावात जाऊन शुक्रवारी पहाटे ही रोकड जप्त करण्यात आली


नागपूर : हवाला व्यावसायिकांमध्ये खळबळ उडवून देणा-या आणि राज्य पोलीस दलाला जबर हादरा देणा-या नागपूरच्या हवालाकांडात पोलिसांसोबत संगनमत करून लुटलेल्या २ कोटी, ५५ लाखांपैकी अडीच कोटींची रोकड जप्त करण्यात आली. नंदनवन पोलिसांच्या पथकाने चंद्रपूर जिल्ह्यातील भीसी गावात जाऊन शुक्रवारी पहाटे ही रोकड जप्त केली.

रविवारी पहाटे २.३० च्या सुमारास हवालाची रोकड घेऊन जाणारी एमएच ३१/ एफए ४६११ क्रमांकाची डस्टर कार प्रजापती चौकाजवळ नंदनवन पोलिसांनी अडवली होती. या कारमधून ३ कोटी, १८ लाखांची रोकड जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले होते. रायपूरहून (छत्तीसगड) मधील मॅपल ज्वेलर्सचे संचालक खजान ठक्कर यांनी ही रोकड नागपुरातील हवाला व्यावसायिक प्रशांत केसानी याच्याकडे पोहचवण्यासाठी पाठवली होती, अशी माहिती कारचालक राजेश वामनराव मेंढे (वय ४०, रा. मिनिमातानगर, कळमना) आणि नवनीत गुलाबचंद जैन (वय २९ रा. शांतिनगर, तुलसीनगर जैन मंदिराजवळ) या दोघांनी दिल्याचेही पोलीस सांगत होते. मात्र, कारमध्ये ५ कोटी, ७३ लाख रुपये होते आणि त्यातील २ कोटी, ५५ लाखांची रोकड लंपास झाल्याचा आरोप मनीष खंडेलवाल या तरुणाने पोलिसांकडे रविवारी दिलेल्या तक्रारीतून नोंदवला होता. त्यामुळे या प्रकरणाला भलतेच वळण लागले. वरिष्ठांनी कसून चौकशी केली असता नंदनवन ठाण्याचा सहायक पोलीस निरीक्षक सुनील सोनवणे याने त्याच्या मर्जीतील पोलीस कर्मचा-यांना हाताशी धरून कुख्यात गुन्हेगार सचिन नारायण पडगिलवार (वय ३७), रवी रमेश माचेवार (वय ३५), गजानन भालेनाथ मुगधुने (वय २७) आणि प्रकाश बबलू वासनिक (वय २२, सर्व रा. नंदनवन झोपडपट्टी) यांच्याशी संगनमत करून कारमधील २ कोटी, ५४ लाख, ९२ हजार, ८०० रुपये लुटल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनीच दरोडा टाकून घेतल्याचे स्पष्ट झाल्यामुळे राज्य पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली. अवघ्या पोलीस दलाच्या प्रतिमेवरच काळे फासल्यासारखे झाल्याने वरिष्ठ अधिका-यांनी त्याची गंभीर दखल घेतली. रविवारपासून रात्रीचा दिवस करीत पोलिसांनी तपासकाम केले.
सचिन पडगिलवार, रवी माचेवार, गजानन मुगधुने आणि प्रकाश वासनिक या चार गुन्हेगारांना सातारा पोलिसांच्या मदतीने महाबळेश्वरमध्ये बुधवारी अटक करण्यात आली. येथे आणल्यानंतर गुरुवारी त्यांची दिवसभर चौकशी करण्यात आली. त्यांनी या दरोड्यात सहभागी असलेला सहायक पोलीस निरीक्षक आणि अन्य पोलिसांचे पाप कथन केले. त्यानंतर अली हुसेन जिवानी (वय ३६, रा. मोमिनपुरा) यांच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी रात्री उपरोक्त आरोपींविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला.

नातेवाईकांकडे लपविली रोकड
पोलीस उपायुक्त निलेश भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदनवनचे पोलीस निरीक्षक मुकूंद साळुंके यांच्या नेतृत्वात एक पोलीस पथक गुरुवारी मध्यरात्री चंद्रपूर जिल्ह्यातील भीसी गावात पोहचले. या पथकाने पहाटे ३ वाजता आरोपी गजानन मुगधुणे याच्या नातेवाईकांच्या घरात दडवून ठेवलेली २ कोटी, ५० लाखांची रोकड जप्त केली. मुगधुने हा मुळचा भीसी येथील रहिवासी आहे. तो येथे वाहनचालक म्हणून काम करतो. आरोपींनी नोटांचे हे बंडल युरियाच्या बॅगमध्ये कोंबून ठेवले होते. ही रोकड घेऊन नागपुरात पोलीस पथक पोहचल्यानंतर ती नंदनवन ठाण्यात मोजून घेण्यात आली. त्याचे व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments