Placeholder canvas
Tuesday, April 30, 2024
Homeमहाराष्ट्रआगीपासून वाचण्यासाठी बाथमरुममध्ये धुरात गुदमरुन त्या सर्वांचा मृत्यू ?

आगीपासून वाचण्यासाठी बाथमरुममध्ये धुरात गुदमरुन त्या सर्वांचा मृत्यू ?

महत्वाचे…
१.आग लागल्यानंतर रेस्तराँमध्ये गोंधळाची स्थिती होती २. बांबू आणि प्लास्टिकचे छप्पर असल्याने आग पसरत होती. ३. एका तरुणीच्या वाढदिवसाची पार्टी सुरु होती


मुंबई: कमला मिल कम्पाऊंडमधील ‘१ अबव्ह’ या रेस्तराँ- बारमध्ये लागलेल्या आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू झाला. रेस्तराँमध्ये अग्निरोधक यंत्रणाच नव्हती, अशी माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे मार्ग सापडत नसल्याने यातील काही जण बाथरुमच्या दिशेने पळाले. मात्र, बाथमरुममध्ये धुरात गुदमरुन त्या सर्वांचा मृत्यू झाला.

ट्रेड हाऊसमधील टेरेसवर ‘१ अबव्ह’ आणि त्याच्या बाजूला मोजोस ब्रिस्ट्रो हे रुफ टॉप रेस्तराँ आणि बार आहेत. यातील ‘१ अबव्ह’मध्ये रात्री साडे बाराच्या सुमारास आग लागली आणि ही आग झपाट्याने मोजोस ब्रिस्ट्रो या पबपर्यंत पोहोचली. बांबू आणि प्लास्टिकचे छप्पर असल्याने आग पसरत होती.

आग लागल्यानंतर रेस्तराँमध्ये गोंधळाची स्थिती होती. इमर्जन्सी एक्झिट मार्ग सापडत नसल्याने अनेक जण बाथरुमच्या दिशेने पळाले. मात्र, हीच त्यांची घोडचूक ठरली. बाथरुममध्ये धुरात गुदमरुन त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते. या घटनेतील १४ जणांचा आगीच्या धुरामुळे गुदमरुन मृत्यू झाला, असे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी एका तरुणीच्या वाढदिवसाची पार्टी सुरु होती. तिचा देखील या आगीत मृत्यू झाला.

कमला मिल कंपाऊंडमध्ये मराठी, इंग्रजी वृत्तवाहिन्यांचे तसेच खासगी कंपन्यांचे कार्यालय आहे. कंपाऊंडमध्ये अंदाजे ४२ रेस्टॉरंट आणि पब आहेत. या आगीचा फटका काही वृत्तवाहिन्यांच्या कार्यालयांनाही बसला आहे.

एवढ्या छोट्या जागेत ९६ रेस्तराँना परवानगी दिलीच कशी?’

कमला मिल कम्पाऊंडमधील ‘वन अबव्ह’ रुफटॉप बारमधील आगीच्या घटनेवरुन काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी मुंबई महापालिकेवर टीकास्त्र सोडले आहे. कमला मिलमध्ये एवढ्या छोट्या जागेत ९६ रेस्तराँना परवानगी मिळालीच कशी असा सवाल उपस्थित करत संजय निरुपम यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले.

कमला मिल कंपाऊंडमधील ‘वन अबव्ह’ या रुफटॉप बारमध्ये गुरुवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले. या अग्नितांडवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी ट्विटरवरुन महापालिकेवर टीकास्त्र सोडले. कमला मिल कम्पाऊंड या छोट्याशा परिसरात ९६ रेस्तराँ आहेत. त्यांना महापालिकेकडून परवानगी मिळालीच कशी, या रेस्तराँमध्ये फायर ऑडिटही झाले नव्हते. पब आणि रेस्तराँ मालकांच्या निष्काळजीपणामुळे निष्पापांचा मृत्यू झाला, असे त्यांनी म्हटले आहे. महापालिकेतील विरोधी पक्षनेत्यांनी तीन महिन्यांपूर्वीच महापालिका अधिकाऱ्यांचे या प्रकारांकडे लक्ष वेधले होते. मात्र, महापालिकेने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, असा आरोपही त्यांनी केला आहे. आता महापालिका त्यांच्या अधिकाऱ्यांनाही या घटनेसाठी जबाबदार ठरवणार का, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

सोशल मीडियावरही या घटनेवरुन संताप व्यक्त होत आहे. रुफटॉप बार ही संकल्पना राबवली जात असताना या बारमधील सुरक्षेची जबाबदारी कोणाची, महापालिकेने या बारमधील फायर ऑडिट केले होते का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments