मुंबई : राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. मात्र, निकालापासून आतापर्यंत भाजपावर जोरदार हल्लाबोल करणारे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा टि्वटच्या माध्यमातून भाजला डिवचले. आज शुक्रवारी सकाळी राऊत यांनी ट्विट करत अप्रत्यक्षपणे भाजपाला टोला लगावला आहे. “हम शतरंज में कुछ ऐसा कमाल करते हैं, कि बस पैदल ही राजा को मात करते हैं” हा शेर संजय राऊत यांनी शेअर केला आहे.
उध्दव ठाकरे यांनी गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि आईवडिलांचे स्मरण करून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की..’ अशा शब्दांत ठाकरे घराण्यातील पहिल्या व्यक्तीने गुरुवारी शिवाजी पार्क मैदानावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. महाराष्ट्रामध्ये नव्या समिकरणाची नांदी सुरु झाली. शिवसेनेच्या तीन, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रत्येकी दोन अशा एकूण सात मंत्र्यांनी शपथविधी घेतला. देशात बिगरभाजप प्रादेशिक-राष्ट्रीय पक्षांची एकजूट शक्य असल्याचा राजकीय संदेश भाजप विरोधी पक्षनेत्यांनी दाखवून दिला.
हम शतरंज में कुछ ऐसा कमाल करते हैं
कि बस पैदल ही राजा को मात करते हैं— Sanjay Raut (@rautsanjay61) November 29, 2019
शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारचा शपथविधी झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांनी शपथ घेतली. राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी शपथ घेतली.