महत्वाचे…
१.चारकोपमधील वॉर्ड २१ मध्ये पोटनिवडणूक २. गिरकर कुटुंबियांसोबत शिवसेनेचे जुने संबंध ३. १९९७ पासून ते आतापर्यंत असे तब्बल २० वर्ष नगरसेवकपद भूषवलं ४. चारकोपमधील वॉर्ड २१ मध्ये पोटनिवडणूक होत आहे.
मुंबई: प्रचंड टोकाचा प्रचार करत मुंबई महापालिका गाजवणाऱ्या शिवसेना- भाजपमध्ये अखेर एका जागेवर तह झाला आहे. मुंबईतील वॉर्ड क्रमांक २१ च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने भाजप उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजप नगरसेविका शैलजा गिरकर यांच्या मृत्यूमुळे चारकोपमधील वॉर्ड २१ मध्ये पोटनिवडणूक होत आहे. शैलजा गिरकर यांच्या जागी त्यांची सून प्रतिभा गिरकर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. पाठिंब्यासाठी भाजप आमदार भाई गिरकर आणि मंत्री विनोद तावडे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. गिरकर कुटुंबियांसोबत शिवसेनेचे जुने संबंध आहेत.गिरकर कुटुंबीयांचा उमेदवार असल्यास शिवसेना या पोटनिवडणुकीत उमेदवार देणार नाही, अशी भूमिका घेत उद्धव ठाकरेंनी पोटनिवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. प्रभाग क्रमांक २१ व ६२ च्या पोटनिवडणुकीसाठी १३ डिसेंबरला मतदान होणार आहे.
शैलजा गिरकर कोण होत्या?
शैलजा गिरकर या चारकोप वॉर्ड क्रमांक २१ मधून निवडून आल्या होत्या. मात्र १० सप्टेंबर २०१७ रोजी त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. त्यापूर्वी गिरकर यांनी १९९७ पासून ते आतापर्यंत असे तब्बल २० वर्ष नगरसेवकपद भूषवलं. त्यांनी उपमहापौरपदही भूषवलं आहे.