Tuesday, December 3, 2024
Homeमहाराष्ट्रशरद पवारांनी मानले ठाकरे बंधूचे आभार,हे आहे कारण...

शरद पवारांनी मानले ठाकरे बंधूचे आभार,हे आहे कारण…

sharad-pawar-health-issue-uddhav-thackeray-raj-thackeray-pray-for-his-recovery-news-updates
sharad-pawar-health-issue-uddhav-thackeray-raj-thackeray-pray-for-his-recovery-news-updates

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती रविवारी सायंकाळी बिघडली होती. पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यानं पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी केलेल्या वैद्यकीय तपासणीत पवारांना पित्ताशयाचं निदान झालं. हे वृत्त समोर आल्यानंतर पवार यांनी पहिल्यांदाच ट्वीट करत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानले आहेत.

शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती समोर आल्यानंतर राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांची प्रकृती लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना केली आणि सदिच्छा व्यक्त केल्या. दरम्यान, प्रकृती बिघडल्यानंतर पवारांनी पहिल्यांदाच ट्वीट केले असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन आणि लता मंगेशकर यांचे आभार मानले आहेत.

“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्या प्रकृतीसंदर्भात अत्यंत आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या सदिच्छा या महाराष्ट्राच्या प्रातिनिधिक भावना आहेत. मनपूर्वक आभार!,” असं पवारांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी माझ्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सदिच्छा व्यक्त करत आस्थेने चौकशी केली. त्यांचे मनापासून आभार!,” अशा शब्दात पवारांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

लता मंगेशकरांचे आभार

“माझ्या प्रकृती अस्वास्थ्याची बातमी कळताच आदरणीय लता मंगेशकर दिदींनी माझ्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून माझ्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. लता दिदींसारख्या सुहृदय व्यक्तींच्या सदिच्छा माझ्या सोबत आहेत. त्यांचा मी मनपूर्वक आभारी आहे,” असंही पवार यांनी म्हटलं आहे.

पवारांचे सर्व कार्यक्रम रद्द

रविवारी सायंकाळी पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यानंतर पवारांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पित्ताशयाचं निदान झाल्यानंतर पवारांवर आता शस्त्रक्रिया केली जाणार आहे. ३१ मार्च रोजी पवार रुग्णालयात दाखल होणार आहे. दरम्यान, प्रकृतीच्या कारणामुळे शरद पवार यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments