मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक वाढत चालला आहे. मृत्यूंच्या संख्येतही मोठी वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक निर्बंध लागू करत, राज्यात रात्रीची संचारबंदी देखील घोषित केलेली आहे. तर, मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउनचे देखील संकेत दिलेले आहेत. आज दिवसभरात राज्यात ३१ हजार ६४३ नवीन करोनाबाधित आढळले असून, १०२ रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.
राज्यातील मृत्यूदर आता १.९८ टक्के इतका आहे. राज्यात आज रोजी एकूण ३,३६,५८४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. याचबरोबर आज राज्यात २० हजार ८५४ रुग्ण कोरोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २३,५३,३०७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८५.७१ टक्के एवढे झाले आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९४,९५,१८९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २७,४५,५१८ (१४.०८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १६,०७,४१५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर १६,६१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे खाटा व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्या असून स्थिती अशीच राहिली तर मृत्यू संख्याही वाढण्याचा धोका आहे.
त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रणासाठी मर्यादित काळासाठी राज्यात टाळेबंदीसारखे कठोर निर्बंध त्वरित लावण्यासाठी नियोजन करा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी करोना कृतीदलाच्या तातडीने बोलावलेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या.
राज्यात करोनाची स्थिती गंभीर असून विविध योजना आखूनही अद्याप ती आटोक्यात आली नाही. या संदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी रविवारी करोना कृतीदलाची तातडीची बैठक घेतली. बैठकीला आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे तसेच मुख्य सचिव सीताराम कुंटे, करोना कृतीदलातील डॉक्टर्स व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.