मुंबई : ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक सोमनाथ पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झालंय. त्यांच्यावर मुंबईतल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. ते ६४ वर्षांचे होते. सोमनाथ पाटील हे खरंतर पूर्वाश्रमीचे प्रशासकीय अधिकारी होते. १९८४ साली एमपीएसीमार्फत प्रशासकीय सेवेत दाखल झाल्यानंतर त्यांनी काही काळ पनवेल पालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम पाहिलं. पण तिथे फार काळ रमले नाहीत. नंतर पुढे त्यांनी पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचं पदव्युत्तर शिक्षण घेऊन मराठी वृत्तपत्रसृष्टीत प्रवेश केला.
उपसंपादक, सहसंपादक, वृत्तसंपादक ते कार्यकारी संपादक अनेक महत्वाची पदं त्यांनी समर्थपणे सांभाळली. तसंच नियमितपणे स्तंभलेखनही केलं. सकाळ माध्यमसमुहातही त्यांनी सहसंपादक म्हणून काम पाहिलं. तसंच दै. गावकरी आणि ‘दै. एकमत’मध्येही त्यांनी बराच काळ कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळली.
नंतरच्या काळात ते दै. पुण्यनगरीत नियमित स्तंभलेखनही करायचे. मुंबई मराठी पत्रकारसंघाचेही ते माजी उपाध्यक्ष राहिलेत. त्यांच्या तिसरी मुंबई या पुस्तकास मुंबई मराठी पत्रकार संघाचा अप्पा पेंडसे पुरस्कारही प्राप्त झाला होता. तसंच रशियातील मास्को विद्यापीठाच्या शिष्यवृत्तीचेही ते मानकरी ठरले होते.